अरुण आडिवरेकर रत्नागिरी : मोबाईलवर सेल्फी काढण्याचा मोह सर्वांनाच असतो. मोबाईलवर सेल्फी काढून तो आपल्या ग्रुपवर किंवा मित्रांमध्ये शेअर करण्यास सर्वच उत्सुक असतात. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी सेल्फी पॉईंट उभारला आहे. या सेल्फी पॉईंटवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनाही सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांसोबत त्यांनीही सेल्फी काढला.लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांची संख्या वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे मतदारांची संख्या वाढण्यास मदत झाली आहे. मात्र, वाढलेल्या मतदारांची संख्या प्रत्यक्ष मतदानावेळी पुढे येणे गरजेचे असल्याने, मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहेत.
सुरूवातीलाच रत्नागिरी येथील तहसील कार्यालय येथे सेल्फी पाँईट उभारण्यात आला असून, सिंधुदुर्गमध्येही सावंतवाडी येथील तहसील कार्यालयाजवळ सेल्फी पॉईंटची उभारणी करण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळी सेल्फी पॉईंट तयार करून मतदानाविषयी जागृती करण्यात येणार आहे. पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनाही यामुळे मतदानाची आठवण होण्यास मदत होणार आहे.निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान नोंदणीसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले होते. शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्याचबरोबर मतदार नोंदणीसाठी दोन - दोन दिवसांचे शिबिरही घेण्यात आले. त्यामुळे यावर्षी मतदारांच्या संख्येत ९० हजार ६६७ने वाढ झाली आहे.
विशेषत: १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या वाढली आहे. मतदारांची वाढलेली संख्या प्रत्यक्ष मतदानात दिसणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. जनजागृतीही करण्यात येत आहे. या जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदानासाठी नागरिकांनी घराबाहेर पडावे, हा उद्देश आहे.रत्नागिरी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच सिंधुदुर्ग जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या प्रयत्नाने सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. रत्नागिरी तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे आकर्षण सर्वांनाच वाटत आहे. या सेल्फी पॉईंटचा मोह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनाही झाला. त्यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, प्रांताधिकारी अमित शेडगे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांच्यासमवेत याठिकाणी सेल्फी काढला.पर्यटनस्थळी सेल्फी पॉईंटसध्या ह्यसेल्फीह्ण आणि त्यासाठी सेल्फी पॉईंटचे आकर्षण सर्वांनाच आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांच्या ठिकाणीही सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे आता हे सेल्फी पॉईंट याठिकाणी येणाऱ्या मतदारांना मतदानाची आठवण करून देतील.