टेंभ्ये/रत्नागिरी : कोविड काळामध्ये लॉकडाऊन असताना अथवा एखादा परिसर कन्टेनमेंट झोन केला असल्याने शिक्षकांना शाळेत उपस्थित राहता आले नाही. अशा परिस्थितीमध्ये संबंधित कालावधीतील रजा ही कोविड विशेष रजा म्हणून ग्राह्य धरण्याबाबतचा स्वतंत्र प्रस्ताव शासनास सादर करण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिक्षण उपसंचालकांना दिले. यावेळी त्यांनी वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पीटीआरची आवश्यकता नसल्याचेही सांगितले.मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे पदाधिकारी व शिक्षण उपसंचालक, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी यांची संयुक्त सभा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली होती. सामंत यांनी अध्यापक संघाच्या प्रश्नावलींवर शाळासंहिता व शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाच्या आधारे विवेचन करत माध्यमिक शिक्षण विभागाला अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे आदेश दिले.शिक्षण विभागाकडून अद्ययावत पीटीआरची मागणी केली जात असल्याने जिल्ह्यातील वादग्रस्त संस्थांमधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव प्रलंबित आहेत. याबाबत सामंत यांनी शाळा संहितेतील तरतुदीप्रमाणे वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पीटीआरची मागणी करण्यात येऊ नये असे आदेश शालेय शिक्षण विभागाला दिले.
वादग्रस्त संस्थांमधील मुख्याध्यापकांनी लिहिलेला शिक्षकांचा गोपनीय अभिलेख ग्राह्य धरण्यात यावा, अशी सूचना दिली. शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया विनाविलंब करण्यात यावी व शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे निवड श्रेणी मंजूर करण्यात यावी, यासाठी प्रत्येकवेळी पाच शिक्षकांचा नवीन संच आवश्यक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे, सहाय्यक संचालक सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील, जिल्हा कार्यवाह रोहित जाधव, कायदेशीर सल्लागार आत्माराम मेस्त्री, उपाध्यक्ष गणपत शिर्के, सुशांत कविस्कर, महिला संघटक सुनीता सावंत उपस्थित होत्या.