चिपळूण : कोकणचे बुध्दीवैभव म्हणून गणले जाणारे माजी आमदार निशिकांत माधव तथा नाना जोशी यांचे आज (शनिवारी) दुपारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या रुपाने राजकीय, सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक व कला क्षेत्रातील एक अजोड व्यक्तीमत्त्व हरपले. उद्या रविवारी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर रामतीर्थ स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रात्री जोशी यांचे अंत्यदर्शन घेतले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मुंबईत नोकरी करुन त्यांनी शिक्षण पूर्ण केले. चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूल येथे शिक्षक म्हणून नोकरी करत असताना २० जून १९६५ मध्ये दैनिक सागर हे संपूर्ण महाराष्ट्रात तालुका पातळीवर निघणारे पहिले वर्तमानपत्र सुरु केले. पत्रकारितेत विविध पुरस्कार, स"ाद्री वाहिनीचा रत्नदर्पण पुरस्कार, सोव्हिएत युनियनमधील एपीएन या शासकीय वृत्तसंस्थेकडून रशियाच्या तीन आठवड्यांच्या भेटीसाठी पत्रकार म्हणून विशेष निमंत्रण, मास्को महापालिकेतर्फे सत्कार असा अनेक ठिकाणी त्यांचा गौरव झाला आहे. नुकताच त्यांना एक्सलन्स आॅफ कोकण अॅवॉर्ड सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला होता. १९८५ मध्ये ते चिपळूणमधून काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचा संचालक, महाराष्ट्र सरकारच्या रोजगार हमी योजना कार्यकारिणी सदस्य, राज्य सरकारच्या कोकण सिंचन अभ्यास मंडळ सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. कोकण सांस्कृतिक अकादमीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. साहित्य संमेलन व नाट्य संमेलनाचे संयोजन त्यांनी केले आहे. १६ वर्षे कुमार गंधर्व संगीत महोत्सवाचे संयोजन त्यांनी केले होते. राज्य व केंद्र सरकारच्या माजी सैनिक सल्लागार समिती, राज्य व केंद्र सरकारच्या डब्ल्युटीओ समिती, निसर्ग संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य असताना त्यांनी देशातील २६ राज्यांना भेटी दिल्या.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना जोशी हरपले
By admin | Published: June 04, 2017 1:38 AM