रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कोषागार विभागातील वरिष्ठ लिपिकास ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली़ मयत माजी सैनिकाच्या मुलाच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली़सुभद्रा सावंत यांच्या पतीचे नुकतेच निधन झाले़ पती माजी सैनिक असल्याने सावंत यांचे वारस म्हणून नाव लागून त्यांच्या नावे पेन्शन सुरु करण्यासाठी कोषागार कार्यालयातून लाईफ टाईम एरिअर्स प्रमाणपत्राची आवश्यकता होती़ या प्रमाणपत्रासाठी सावंत यांनी आपल्या मुलासह कोषागार कार्यालयामध्ये अनेक दिवस खेपा मारल्या़ तरीही कोषागार कार्यालयातील लेखा शाखेमधील वरिष्ठ लिपिक सुरेश नारायण चव्हाण (४०) यांनी विविध कारणे सांगून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली़ त्यानंतर चव्हाण यांनी सावंत यांच्याकडे प्रमाणपत्रासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली़ सावंत यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून चव्हाण याच्याविरोधात तक्रार दाखल केली़ त्यानंतर लाचलुचपतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये चव्हाण यांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले़ या प्रकरणी चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (शहर वार्ताहर)
वरिष्ठ लिपिकास लाच घेताना अटक
By admin | Published: November 16, 2014 12:20 AM