लांजा : थोर विचारवंत, समाजसेविका, लांजा महिलाश्रम संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा, विश्वस्त कुमुदताई रेगे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबई येथे वृद्धापकाळाने रविवारी पहाटे निधन झाले.
कोकणचे गांधी पू. आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कार्याने प्रेरित होऊन कुमुदताई यांनी आपले आयुष्य समाजातील शोषित, दुर्बल आणि वंचित घटकांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी घालवले. त्यांनी सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन केलेले हे काम उल्लेखनीय ठरले आहे.लांजातील कै. श्रीमती जानकीबाई (आक्का) तेंडुलकर महिलाश्रम संस्थेच्या स्थापनेत मोलाचा वाटा आणि पुढाकार घेतलेल्या कुमुदताई यांचे सामाजिक कार्य उत्तुंग असेच होते. दु:खीत, पीडित आणि दुर्लक्षित महिला आणि मुलांची सेवा त्यांनी केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन देशसेवा आणि समाजसेवेचे व्रत त्यांनी अंगिकारले. कोकणचे गांधी पू. आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कार्यात त्यांनी झोकून देऊन काम केले. कुमुदताई यांच्यावर राष्ट्रसेवा दलाच्या पगडा होता.१९२२ साली रत्नागिरी येथे जन्म झालेल्या कुमुदतार्इंनी १९४५पासून कस्तुरबा ट्रस्टचे व्रत हाती घेतल्यापासून साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे व्रत अंगिकारुन मानव्याच्या सेवेत स्वत:ला झोकून दिले. त्या जन्मभर अविवाहित राहिल्या. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण रत्नागिरीत तर उच्चशिक्षण सांगली आणि पुणे येथे झाले.
त्या काळातील स्वातंत्र चळवळ, भंगीमुक्ती ते मृत जनावरांचे शवविच्छेदन असे परिवर्तनशील कार्य केले. त्यांचे वडील अनंत रेगे हे त्याकाळी रत्नागिरीतील नामांकित वकील होत. स्वातंत्र्य आणि सामाजिक कार्याशी वडिलांचा संबंध राहिल्याने ते संस्कार बालवयातच कुमुदताई यांचेवर लहानपणापासून झाले.
महिला मंडळ, वीरबाला संघटना, मनोरुग्णालय, बालन्यायालय, निरीक्षण गृह आदी संस्थाचे त्यांनी काम पाहिले. रत्नागिरी अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्यपदही त्यांनी सांभाळले. त्यांना विविध राष्ट्रीय आणि जागतिक मानसन्मान मिळाले आहेत. त्यांच्या सेवाभावी कार्याची नोंद अनेक स्तरावर घेण्यात आली होती.