निष्ठावंतांची दैना : जिल्हा शिवसेनेत असंतोषाचे वादळ$$्निरत्नागिरी : जिल्हा परिषदेत गटनेता व अध्यक्षपदाचा मान रत्नागिरी तालुक्याला मिळाला. जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या पत्नी रचना महाडिक यांच्या अध्यक्षपदाच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली. त्यामुळे जिल्हा शिवसेनेचा रिमोट ‘मातोश्री’वरूनच रत्नागिरीच्या नेत्यांकडे दिला गेला आहे काय, या चर्चेला उधाण आले आहे. परिणामी ‘सेनेतील निष्ठावंतांची दैना आणि त्यांचे म्हणणे वरिष्ठांना ऐकू येईना’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्हा शिवसेनेत असंतोषाचे वादळ घोंगावत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. रत्नागिरी नगरपरिषदेत सेनेची एकहाती सत्ता आणल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही रत्नागिरी तालुक्यातील सर्व जागांवर सेनेला विजय मिळाला. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील आमदार उदय सामंत व पदाधिकाऱ्यांचे जिल्हा शिवसेनेतील वजन वाढले आहे. जिल्हा परिषदेत सेनेचा गटनेता व आता जिल्हा परिषद अध्यक्षपदही रत्नागिरी तालुक्यालाच मिळाले आहे. जिल्हाप्रमुखांच्या मागणीलाही सेनेच्या वरिष्ठांनी केराची टोपली दाखवत रत्नागिरीला झुकते माप दिल्याने जिल्हा शिवसेनेवर रत्नागिरी तालुक्याचे वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्हा सेनेतील अनेक नेते मंडळी धास्तावली आहेत.जिल्हा शिवसेनेत असलेल्या काहीजणांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या काही चुका आता त्यांना भोवत असून, त्यामुळेच काही बोलक्या नेत्यांची तोंडे बंद झाली आहेत. संघटनेत तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी स्थिती झालेल्या या नेत्यांनी आपल्याच पायावर धोंडा मारून घेतल्याची चर्चाही जोरात आहे. (प्रतिनिधी)
सेनेचा रिमोट रत्नागिरीत?
By admin | Published: March 24, 2017 12:26 AM