आॅनलाईन लोकमतअडरे (जि. रत्नागिरी), दि. १९ : चिपळूण तालुक्यातील करंबवणे खाडीत गेल्या काही दिवसांपासून मृत मासे आढळून येत आहेत. त्यामुळे मच्छीमार हैराण झाले आहेत. लोटे सीईटीपीमधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे मासे मृत झाले असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमारांकडून केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून करंबवणे खाडीमध्ये मृत माशांचे प्रमाण वाढत आहे. लोटे येथील सीईटीपीमधून सुटलेल्या रासायनिक पाण्यामुळे हे मासे मृत होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या खाडीत वेगवेगळ्या प्रकारची मासळी मिळत असल्याने मच्छिमार सुखावलेले असताना चार दिवसांपासून मासे मृत होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चिपळूण, गुहागर, खेड, दापोली अशा चार तालुक्यात असलेल्या या खाडीत अनेक प्रकारची मासळी मिळत होती. त्यामुळे नदीकाठच्या अनेक मच्छिमार कुटुंबांचा उदरनिर्वाह मच्छी व्यवसायावर चालत असे. गेल्या काही वर्षांपासून करंबवणे खाडीत सांडपाणी सोडल्यामुळे मासे मृत होऊ लागले आहेत. पाण्यावर विशिष्ट प्रकारचा तवंग आला असून, ठिकठिकाणी मृत मासे तरंगताना दिसत आहेत. कुजलेल्या माशांमुळे दुर्गंधी पसरली आहे. ही बाब दरवर्षीचीच असल्याने भिले येथील महेश दिवेकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात जाऊन या प्रकाराची माहिती दिली आहे. खाडीत मासे मरण्याच्या घटना घडत असल्याने मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
करंबवणेत मृत मासे आढळल्याने खळबळ
By admin | Published: June 19, 2017 5:40 PM