राजापूर : तालुक्यातील कोंडसर बुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे आडिवरे-नवेदर येथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला असून, या ठिकाणी कोविड रुग्णांना प्राथमिक आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. गावातच उपचार होत असल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी या कक्षाला भेट देत कोंडसर बुद्रुक ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
कोंडसर बुद्रुक ग्रामपंचायत क्षेत्रात नवेदरवाडी येथे ३१ मे रोजी प्राथमिक शाळेमध्ये काेराेना चाचणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ५० अँटिजन तपासणीमध्ये ४ रुग्ण व ५६ आरटीपीसीआर तपासणीत १२ रुग्ण बाधित आढळून आले. या अनुषंगाने त्वरित ग्रामपंचायत स्तरावर गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून नवेदर येथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी चर्चा करून तशी परवानगी घेण्यात आली.
सध्या या केंद्रात १४ रुग्ण उपचार घेत आहेत. वाडीतील काही युवक स्वत:हून मदतकार्यात सहभागी होत असून, त्यांच्या सहकार्याने रुग्णांना दूध, नाश्ता, जेवण इत्यादी सेवा मोफत दिली जात आहे. तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी सागर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी निखिल परांजपे यांनी कोंडसर ग्रामपंचायतीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवेदर येथे जाऊन कोविड विलगीकरण कक्षाची पाहणी केली.
यावेळी पोलीस पाटील आतिष भेवड, सरपंच आरती मोगरकर, सदस्य प्रसन्न दाते, अण्णा तळये, ग्रामसेवक अनिल पिठलेकर, तलाठी, आरोग्य सेवक, आशासेविका प्रांजल नांदगावकर, स्वयंसेवक मंदार पांचाळ व रिक्षा स्वयंसेवक राकेश पांचाळ उपस्थित होते. स्वयंसेवक म्हणून गजानन पोकळे, मंदार पांचाळ, मंदार दळवी, विनय दाते, दीपेश नांदगावकर, मिथुन नांदगावकर, संजय दाते, गौरव भेवड, भाई फणसे हे काम बघत आहेत.
----------------------
राजापूर तालुक्यातील कोंडसर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या कोविड उपचार कक्षाला तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी भेट देऊन पाहणी केली.