लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील दोन हजारपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या ४५पैकी १८ ग्रामपंचायतींमध्ये कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. या विलगीकरण कक्षांमध्ये सुमारे ५७० रुग्णांची सोय करण्यात येणार आहे. या विलगीकरण कक्षांमध्ये कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
कोरोना रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवू नये, असा निर्णय शासनाने जाहीर केला होता. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील दोन हजार लोकवस्ती असलेल्या ग्रामपंचायतींनी कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष उभारावेत, असे आवाहन केले होते. त्याला रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी चांगला प्रतिसाद दिला आहे. रत्नागिरी तालुक्यामध्ये ९४ ग्रामपंचायती आहेत, त्यापैकी दोन हजार लोकवस्ती असलेेल्या ४५ ग्रामपंचायती असून, त्यातील १८ ग्रामपंचायतींनी विलगीकरण कक्ष उभारले आहेत. या विलगीकरण कक्षांमध्ये ग्रामपंचायतींकडून रुग्णांसाठी सोय करण्यात आली आहे. याठिकाणी रुग्णांसाठी चहा, नाष्टा, जेवणाची सोय ग्रामपंचायतींकडून करण्यात आली आहे.
या विलगीकरण कक्षात कोरोना रुग्णांना १४ दिवस ठेवण्यात येणार आहे. तालुक्यातील वाटदमध्ये २५ रुग्ण, कोतवडेमध्ये १० रुग्ण, चांदोरमध्ये १३ आणि गणपतीपुळे येथे २५ रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी हे दिवसातून दोनदा या विलगीकरण कक्षांना भेट देत आहेत. यावेळी रुग्णांची ऑक्सिजनची पातळी आणि तापमानाची तपासणी केली जात असून, त्यांच्यावर औषधोपचारही करत आहेत.
या कक्षांची जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, पंचायत समिती सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, विस्तार अधिकारी नरेंद्र पराते तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी पाहणी केली. त्याचबरोबर खासदार विनायक राऊत यांनीही गणपतीपुळे, वाटद, कोतवडे, नेवरे येथील विलगीकरण कक्षांना भेट दिली.
.....................
प्रशासनाने घेतल्या १७० इमारती ताब्यात
रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा अशा १७० इमारती प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यादृष्टाने आरोग्य विभाग आणि रत्नागिरी पंचायत समितीने तयारी केली आहे.
....................
कोरोनाचे एकूण रुग्ण - ११,५२९
बरे झालेले रुग्ण - १०,०९६
ॲक्टिव्ह रुग्ण - १,४३३
मृत्यू - ३८८
दोन हजार लोकवस्ती असलेल्या ग्रामपंचायती - ४५
विलगीकरण कक्ष उभारलेल्या ग्रामपंचायती - १८
किती रुग्णांची सोय होणार - ५७०
विलगीकरण कक्ष उभारलेल्या ग्रामपंचायती
नाचणे, शिरगाव, पावस, कुवारबाव, नेवरे, कोतवडे, वाटद, नांदिवडे, मिऱ्या, वरवडे, चांदोर, मिरजोळे, गोळप, कर्ला, करबुडे, जयगड, पूर्णगड, गणपतीपुळे.