रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा परिसरातील अपघातांची मालिका सुरूच असून, हातखंबा दर्ग्याजवळच गुरूवारी रात्री ट्रक उलटून दुसरा अपघात झाला. त्यात तिघेजण जखमी झाले आहेत तर शुक्रवारी सकाळी कापडगाव बसथांब्याजवळ आणखी एक ट्रक उलटून अपघात झाला आहे. यावेळी सुदैवाने दुचाकीस्वार दुसरीकडे गेल्याने बालंबाल बचावला.हातखंबा गाव येथील बसथांब्याजवळ बुधवारी रात्री भीषण अपघात झाला होता. त्यात दुचाकीवरील बाप-लेक ठार झाले तर पत्नी गंभीर जखमी झाली. गुरूवारी रात्री ८.३०च्या दरम्यान येथील दर्ग्याजवळील तीव्र उतारावर कोल्हापूरहून जयगडला चाललेला ट्रक (एमएच २५, टी ५२४७) हा नियंत्रण सुटल्याने उजवीकडे उलटला.
त्याने रत्नागिरीहून कापडगावला चाललेल्या दुचाकी (एमएच०८, एटी ९५५१)ला जोरदार धडक दिली. त्यात संदेश गणपत कोत्रे (३५, रा. कापडगाव - कोत्रेवाडी) हे जखमी झाले. या ट्रकचे चालक व्यंकटभीम सरोदे (३५) व त्याचे वडील भीमकृष्णा सरोदे (६५, दोघे रा. उमरगा, उस्मानाबाद) किरकोळ जखमी आहेत.तिसरा अपघात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता कापडगाव येथील उतारावर बसथांब्याजवळ झाला. ट्रकचालक उगमशे पद्वसे राजपूत (रा. कर्नाटक) हा कर्नाटकातून साखरेची पोती भरून ट्रक (केए ४८, ९६३७) घेऊन येत होता. कापडगाव येथे रस्त्याच्या बाजूला ट्रक उलटला. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या दुचाकी (एमएच ०२, एजे १९०९)ला ट्रक धडकला. यावेळी दुचाकीस्वार विश्वनाथ मनोहर कोत्रे (रा. कापडगाव) हे पेट्रोल पंपावर गेल्याने वाचले.या अपघातातील सर्व जखमींना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या हातखंबा येथील रूग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. अपघातस्थळी हातखंबा महामार्ग पोलिसांनी तातडीने जात जखमींना रुग्णवाहिकेत ठेवण्यासाठी मदत केली. या अपघातात दोन्ही ट्रकचे व दुचाकीचे नुकसान झाले आहे.