रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने चांगला वेग घेतला आहे. या चौपदरीकरणात कशेडी घाटातील वेडीवाकडी आणि काहीशी धोकादायक वळणे टाळण्यासाठी बोगदा तयार केला जात आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दोनपैकी एक बोगदा गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असल्याने त्याचे काम वेगाने केले जात आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवाला येणारे चाकरमानी घाटाऐवजी बोगद्यातून येतील, अशी आशा निर्माण झाली आहे.मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज शुक्रवार सकाळपासून आपला महामार्ग पाहणी दौरा सुरू केला आहे. पनवेल ते झाराप अशी पाहणी ते करणार आहेत. गणेशोत्सवापर्यंत एक मार्गिका पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वेड्यावाकड्या वळणांच्या कशेडी घाटात डोंगर फोडून चौपदरीकरण करणे अवघड होते. त्यासाठी येथे येण्याजाण्याचे दोन बोगदे बांधले जात आहेत. त्यांचे काम गतीने सुरू आहे. त्यातील एक बोगदा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आज मंत्री चव्हाण त्याचीही पाहणी करणार आहेत.
झक्कास! चाकरमान्यांनो आता गणेशोत्सवाला बोगद्यातून या, कशेडी घाटातील वेड्यावाकड्या वळणांपासून सुटका
By मनोज मुळ्ये | Published: July 14, 2023 11:59 AM