दापोली : दापोली उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राबाहेर वारंवार होणाऱ्या गर्दीवर शहरातील सेवाभावी वृत्तीच्या कार्यकर्त्यांनी तोडगा शोधून काढला आहे. उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्र दापोली शहरातील साेहाेनी विद्यामंदिर शाळेच्या इमारतीत हलविण्यात आले आहे. या ठिकाणी सेवाभावी वृत्तीच्या कार्यकर्त्यांकडून नोंदणी अर्ज भरून घेतले जात आहेत. त्यानंतर वयोगटानुसार लाेकांचे वर्गीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश भागवत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दापोली उपजिल्हा रुग्णालयात लस घेण्यासाठी दररोज सकाळपासून नागरिकांची गर्दी होत असून, जर लस आलेली नसेल तर नागरिकांना माघारी जावे लागत असे. तसेच गर्दीही होत असल्याने हा विषय प्रशासनाच्या हाताबाहेर जाऊ लागला होता. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करायचे की, गर्दीवर नियंत्रण मिळवायचे, हा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला पडला होता.
या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरातील व्यावसायिक समीर गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश भागवत यांची भेट घेऊन लसीकरण केंद्रावर नागरिकांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. दररोज लसीकरण केंद्रावरील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने डॉ. भागवत यांनीही त्याला मान्यता दिली.
समीर गांधी यांचे सहकारी संदीप बागाईतकर या संगणक तज्ज्ञाने यासाठी एक संगणक प्रणालीही विकसित केली असून, आलेल्या अर्जांमधील माहिती या प्रणातील भरल्यावर एखाद्याने कोविशिल्डची पहिली लस घेतली असेल, तर दुसरी लस कोणत्या मुदतीपर्यंत घ्यायला पाहिजे, त्याची माहिती या प्रणालीवर येते. त्यामुळे लसीची गरज अगोदर कोणाला आहे, याचा प्राधान्यक्रम ठरविणे शक्य झाले आहे.
हेल्प ग्रुपमध्ये धनंजय गोरे, प्रा. डॉ. दीपक हर्डीकर, बाळू भळगट, संतोष विचारे, विपुल पटोलिया, हरेश पटेल, प्रसाद फाटक, महादेव काळे, अॅड. विजयसिंह पवार, ऋषिकेश ओक, करिष्मा भुवड, स्नेहल जाधव, गौरव करमरकर, सुमेध करमरकर, प्रकाश बेर्डे, सुरेश केळकर यांचा समावेश आहे.
.....................................
रांग लावण्याची गरज टळली
समीर गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक अर्ज तयार केला. त्यात लस घेणाऱ्याचे नाव, गावाचे नाव, पहिली लस घेतली होती का, ती कोणत्या प्रकारची होती, लस घेतल्याची तारीख, आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक अशी माहिती या भरावयाची आहे. लस घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाकडून हा अर्ज भरून घेण्यात येत आहे. त्यानंतर त्यांच्या मोबाईल क्रमांकावर लस कधी घ्यायची, याची माहिती दिली जाते. त्यामुळे लसीकरण केंद्रावर सकाळी ६ वाजल्यापासून रांग लावण्याची गरज भासत नाही.