पाचल : सध्या स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेत आपल्याला टिकावयाचे असेल, तर मेहनत, आत्मविश्वास व कष्ट करण्याची तयारी पाहिजे. ती असेल तर जगातील कोणतेही यश आपण खेचून आणू शकता. मात्र, त्यासाठी आपण आपले ध्येय निश्चित करून वाटचाल करावी, यश आपल्याकडे चालत येईल, असा सल्ला राजापूरचे पाेलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी दिला.
विद्या निकेतन आणि ग्रामीण समाज प्रबोधिनी येळवण यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन कारण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बाेलत हाेते.
यावेळी राजापूरचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, संस्था अध्यक्ष चंद्रकांत देशपांडे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीमा गांगण, मुख्याध्यापक संभाजी केळुसकर, पोलीसपाटील शुभदा सकपाळ उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत देशपांडे बोलताना म्हणाले की, आपण कितीही मोठे झालात तरी आपले गुरुजन व जन्मदात्या आई-वडिलांना कधीही विसरू नका. वाईट गोष्टींच्या प्रलाेभनाला बळी पडू नका.
विद्यार्थ्यांनी ‘सदैव सैनिका पुढेच जायाचे... हे ध्येयगीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. मुख्याध्यापिका रेवती कोळेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सुधीर शिर्के यांनी सर्वांचे आभार मानले.