राजापूर : महायुतीची राज्यात सत्ता आल्यानंतर लगेचच राजापूर तालुक्यातील विल्ये (नाणार) दशक्रोशी रिफायनरी समर्थक समितीने विजयदुर्ग बंदरासह नाणार परिसरातच रिफायनरी प्रकल्प उभारा, अशी मागणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच नव्या सरकारमधील नेत्यांची भेट घेऊन हजारो एकर जमिनीची शेतकऱ्यांनी दिलेली संमतीपत्रेही दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.कोकणातील रखडलेल्या तेल शुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्पाला गुजरात किंवा आंध्र प्रदेशमध्ये हलवण्याची तयारी केंद्र सरकारकडून केली जात असल्याचे वृत्त पुढे आले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर तातडीने रिफायनरी समर्थकांनी सकारात्मक पावले उचलली आहेत.रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानसभा समन्वयक प्रमोद जठार यांनी कोकणात दोन लाख रोजगार देणारा रिफायनरी प्रकल्प नाणार येथे करावा, अशी मागणी केली आहे. तसेच नाणार परिसरातील सुमारे साडेआठ हजार एकर जमिनीची संमतीपत्रे सरकारकडे सुपुर्द करण्याची तयारीही दर्शवली आहे. त्या संमतीपत्रांच्या आधारे राज्यातील नव्या सरकारने रिफायनरी प्रकल्प नाणार परिसरात राबवावा, अशी मागणी केली आहे.
नाणार (ता. राजापूर) परिसरातील विजयदुर्ग बंदर हे उत्तम नैसर्गिक खोली असणारे बंदर आहे. रिफायनरी प्रकल्पासोबत या बंदराचाही विकास होणार आहे. त्याचा फायदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी होणार आहे. या प्रकल्प उभारणीसाठी शेतकऱ्यांनी जमिनीची संमतीपत्रे दिली आहेत. प्रकल्पविरोधी असलेली नाणारसह अन्य गावे आणि काही वाड्या वगळून विल्ये दशक्रोशी रिफायनरी समर्थक परिसराचा आराखडाही तयार केला आहे. त्यामुळे नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्पाची उभारणी व्हावी, अशी मागणी समर्थक समितीने केली आहे.
खासदार नारायण राणे, राजापूरचे आमदार किरण सामंत, आमदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे, रिफायनरी प्रकल्पाचा सतत पाठपुरावा करणारे माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह अन्य नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित शासनाकडे नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्पाची उभारणी व्हावी, अशी मागणी विल्ये (नाणार) दशक्रोशी रिफायनरी समर्थक समितीतर्फे करण्यात येणार आहे. - अविनाश महाजन, विल्ये (नाणार) दशक्रोशी रिफायनरी समर्थक समिती