खेड : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याची खेड तालुक्यात ७५ लाखांहून अधिक किमतीची मालमत्ता असून, या लिलावासाठी स्थानिक ग्रामस्थही पुढे आले आहेत. सात शेतकऱ्यांनीही या मालमत्तेची खरेदी करण्यात स्वारस्य दाखविले असून, त्यांनी या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्जही दिले आहेत.येत्या मंगळवारी १० नोव्हेंबर रोजी दाऊदच्या एकूण १३ स्थावर मालमत्तांचा लिलाव होणार असून, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी खेड येथे येऊन या मालमत्तेची पाहणी सोमवारी केली होती. यावेळी मुंबके गावातील सात शेतकऱ्यांनी दाऊदच्या मालमत्ता विकत घेण्याची तयारी दर्शविली. या शेतकऱ्यांनी लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आपले अर्ज भरून अधिकाऱ्यांना दिले.दाऊदची मुंबके गावात त्याचा बंगला, आंब्याची बाग असून, लोटे येथे एक भूखंड आहे. यामध्ये सर्व्हे क्रमांक १५०, १५१, १५२, १५३ व १५५ या जमिनींचा समावेश आहे, तर सर्व्हे क्रमांक १८१ मध्ये त्याचा बंगला आहे. मुंबके येथील सर्व मालमत्तेची राखीव किंमत १४ लाख ४५ हजार २०० इतकी ठेवण्यात आली आहे. लोटे येथील ३० गुंठे क्षेत्र असलेल्या भूखंडाची राखीव किंमत ६१ लाख ४८ हजार १०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मुंबईतील चार फ्लॅट, नानी-दमण व अहमदाबाद येथील दोन भूखंडाचा समावेश आहे. केंद्र सरकारने या मालमत्ता ताब्यात घेऊन त्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑनलाईन लिलाव
- १८ गुंठे जमिनीसाठी १ लाख २८ लाख राखीव किंमत आहे.
- २० गुंठे जमिनीसाठी १.५२ लाख, २४.९० गुंठे जमिनीसाठी १,८९ लाख.
- २९.३० गुंठे जमिनीसाठी २.२३ लाख,
- २७ गुंठे जमिनीसाठी २.५ लाख.
- घर क्र. १७२ आणि २७ गुठे जमिनीसाठी ५.३५ लाख
- लोटेतील ३० गुंठे जमिनीसाठी ६१.४८ लाख राखीव किमत आहे.