रहिम दलाल / रत्नागिरीजिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यामध्ये सर्पदंश, विंचूदंश आणि श्वानदंशाच्या एकूण ६०९७ घटना घडल्या़ मात्र, या दंश झालेल्या रुग्णांवर वेळीच उपचार करण्यात आल्याने जिल्ह्यात एकही रुग्ण दगावलेला नसल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे़ जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विषारी विंचू, साप आढळून येतात़ साप, विंचू चावल्यानंतर काही वेळाच विष शरीरात भिनते़ त्यानंतर दंश केलेल्या व्यक्तीला मरणयातना सहन कराव्या लागतात़ दंश केलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार न झाल्यास तो दगावण्याची शक्यता जास्त असते़ विंचूदंशानंतर वेळीच वैद्यकीय उपचार होणे आवश्यक आहे़ ग्रामीण भागामध्ये अजूनही काही ठिकाणी वनस्पतीच्या आधारे विंचूदशांवर उपचार करण्यात येतो़ जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागामध्ये श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ शहरी भागात संबंधित नगर परिषदा आणि ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींकडून श्वानांची संख्या कमी करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत़ शहरी भागात श्वान टोळ्यांनी फिरताना दिसतात़ नवीन व्यक्ती दिसल्यास त्यांच्यावर हल्ला करतात़, तर जनावरांनाही श्वानांनी चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत़ एप्रिल, २०१४ ते नोव्हेंबर, २०१४ या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये सर्पदंश ९६१, विंचूदंश २९८३ आणि श्वानदंशाच्या २१५३ अशा एकूण ६०९७ घटना जिल्ह्यात घडल्या आहेत़ पावसाळ्यानंतर भातशेती कापणीच्या वेळी विंचू, सरपटणारे प्राणी बाहेर पडण्याची संख्या मोठी असते. यावेळी शेतकऱ्यांना विंचूदंश, सर्पदंशाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कापणीच्या कालावधीत विंचू, सर्पदंशाचे रुग्ण मोठ्या संख्येने असतात. अशावेळी शासकीय रुग्णालयात असे रुण सर्रासपणे येत असतात.त्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विंचू, सर्प दंशावरील लस उपलब्ध आहे. त्यामुळे वेळीच उपचार करण्यात येत असल्याने जिल्ह्यात एकही रुग्ण दगावलेला नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान गेल्या काही वर्षात जिल्ह्यात सर्पदंश आणि विंचू तसेच श्वानदंशाचे प्रमाण वाढले आहे. सर्पदंशाचे प्रमाण त्यामानाने कमी असले तरी श्वान आणि विंचूदंशाचे प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात जास्त असल्याचे दिसून येत आहे.
सर्प, विंचू, श्वानदंशाचे सात हजार रुग्ण
By admin | Published: December 28, 2014 12:08 AM