शिवाजी गोरेदापोली : भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे मूळ गाव असलेल्या दापोली तालुक्यातील मुरुड या गावात सरकारकडून २००५ साली स्मारक मंजूर केल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, सतरा वर्षे उलटून गेली तरीही सरकारकडून स्मारक उभारणीचा पाया रचण्यात आला नाही. स्मारकाची घाेषणा करणाऱ्या सरकारला महर्षी अण्णासाहेब कर्वे स्मारकाचे वावडेच असल्याचे दिसत आहे.भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे मुरूड हे मूळ गाव आहे. या ठिकाणी स्मारक उभारण्यासाठी गावकऱ्यांनी सहमती दर्शवली. स्मारकासाठी लागणारी चार गुंठे जागा स्मारक समितीकडे वर्गही करण्यात आली. स्मारकासाठी शासनाकडून १ कोटी रुपये मंजूर झाल्याचेही सांगण्यात आले. परंतु, आजपर्यंत स्मारकाचा साधा पायाही रचण्याचे काम सुरू झालेले नाही. हा प्रस्ताव शासनदरबारी आजवर धूळखात पडला आहे.
मूळ गावात स्मारक नसल्याची खंतभारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या मूळ गावात सरकारकडून स्मारकाची घोषणा करण्यात आली. मात्र, स्मारकाचा विषय शासन दरबारी अजूनही उपेक्षितच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या हयातीत उभारण्यात आलेला अर्धाकृती पुतळा अस्तित्वात आहे. पण, ‘भारतरत्न’च्या मूळ गावातच स्मारक नसल्याची खंत ग्रामस्थांना आहे.
विधवा महिला पुनर्विवाह, स्त्री शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे थोर समाज सुधारक भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे स्मारक होण्यासाठी शासनाकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्याउलट मुरुड गावातील स्मारक इतरत्र हलविण्याचा कुटिल डाव राजकीय पुढाऱ्यांकडून सुरू आहे. इतर महापुरुषांचे स्मारक त्यांच्या मूळ गावी होतात; मग महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे स्मारक का होत नाही? - विवेक भावे, सचिव, स्मारक समिती.
भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे स्मारक त्यांच्या मूळ गावात मुरुड येथेच झाले पाहिजे. महर्षी अण्णासाहेब आमच्या गावचे असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या मूळ गावात स्मारक होण्यासाठी ग्रामस्थांकडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र, राजकीय मंडळींकडून केवळ आश्वासने दिली जातात. सरकारे आली आणि गेली; परंतु स्मारकाबाबत सरकार सकारात्मक कधी होणार? - जानकी बेलोसे, कार्याध्यक्ष, स्मारक समिती.