रत्नागिरी : एकीकडे कोरोनाचे १०७ अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळत असतानाच १४ अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा धक्का रत्नागिरीकरांना रविवारी सकाळी सहन करावा लागला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २७० झाली आहे. त्यातच जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका ७५ वर्षीय कोरोनाबाधित वृद्धेचा मृत्यू झाल्याने आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७ झाली आहे.मिरज येथे पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल रविवारी प्राप्त झाला. मिरज येथून एकूण १२२ अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील १४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर १०७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत आणि १ अहवालाचा कोणताच निष्कर्ष आलेला नाही. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील ४, लांजातील ३, गुहागरातील ३, कामथेतील ३ आणि दापोलीतील एकाचा समावेश आहे. यामधील ४ रूग्ण रत्नागिरीतील कोवीड केअर सेंटर येथे उपचार घेत आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्ण मुंबईहून गावी आल्याचा इतिहास आहे. रविवारी आणखीन १४ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांच्या संख्येत आणखीन वाढ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २७० इतका झाला आहे. जिल्हा कोवीड केअर सेंटर येथे उपचार घेणाऱ्या एका ७५ वर्षीय वृद्धेचा रविवारी सकाळी मृत्यू झाल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ७ झाली आहे.