चिपळूण : तालुक्यातील तिवरे धरणफुटीमुळे कादवड गावाला मार्च महिन्यातच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तिवरे धरणाची पुनर्उभारणी न झाल्याने यावर्षी पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे या गावासमोर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. या गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे केली आहे.
प्रीमिअर लिग स्पर्धा
खेड : तालुक्यातील धामणदिवी येथील सुबोध सकपाळ मित्रमंडळाच्यावतीने २८ आणि २९ मार्च या कालावधीत प्रीमिअर लिग स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्यांना १०,०२१ आणि उपविजेत्याला ५,०२१ रुपयांचे बक्षीस आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांचीही निवड होणार आहे.
सभासद नोंदणी
गुहागर : तालुक्यातील रानवी येथे मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या हस्ते मनसेच्या सभासद नोंदणीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी तालुकाध्यक्ष राजेश शेट्ये, अंजनवेल विभाग अध्यक्ष तेजस पोफळे, उपविभाग अध्यक्ष स्वप्नील कांबळे, कोतळूक विभाग अध्यक्ष संजय भुवड तसेच अन्य विभागांचे अध्यक्ष उपस्थित होते.
मदतीची मागणी
रत्नागिरी : जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ७३५ शेतकऱ्यांच्या २१५ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. यात आंबा, काजूचे सर्वाधिक क्षेत्र आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४० लाख रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.
हरिनाम सप्ताह २७पासून
आवाशी : खेड तालुक्यातील किंजळे येथील उदय क्रीडा मंडळाच्यावतीने २७ ते ३० मार्च या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. २७ रोजी घटस्थापना, ध्वजपूजन, कीर्तन तसेच २८ रोजी कीर्तन, जागर, गाथा पारायण, महाप्रसाद आदी कार्यक्रमांनी सांगता होणार आहे.
बिबट्याचा संचार
राजापूर : तालुक्यातील अनेक भागात सध्या बिबट्यांचा मुक्त संचार सुरु आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील पाळीव जनावरांवर हल्ला करण्याच्या घटनांमुळे तालुक्यात सध्या बिबट्यांची दहशत मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. ग्रामस्थांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
मिलिंद जोशी प्रथम
दापोली : संस्कार भारती, पनवेलच्यावतीने आयोजित केलेल्या महिला लेखिकांच्या साहित्य अभिवाचन स्पर्धेत तालुक्यातील गिम्हवणे येथील मिलिंद जोशी यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेत राज्यभरातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.
कोविड योद्ध्यांचा सत्कार
हातखंबा : येथील नवजीवन ग्रामसंघातर्फे प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सत्कार प्रमाणपत्र व वृक्ष देऊन करण्यात आला. हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर तसेच सर्व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशासेविका, सरपंच, पोलीसपाटील, तलाठी, ग्रामविकास अधिकारी आदींचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा विद्या बोंबले यांच्या हस्ते करण्यात आला.
रक्तदान शिबिर
देवरुख : संगमेश्वर तालुका शिवसेनेतर्फे साडवली येथील पी. एस्. बने स्कूलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी माजी आमदार सुभाष बने, रत्नागिरी - सिंधुदुर्गच्या महिला संघटक नेहा माने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने आदी उपस्थित होते.
पुलासाठी निधी मंजूर
राजापूर : गेल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर तालुक्यातील हातदे - विचारेवाडी ते सावडाव - शेलारवाडी दरम्यान जामदा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलासाठी ३ कोटी ८८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता या ग्रामस्थांची पायपीट थांबणार आहे.