लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्यातील १४ गावांतील २५ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने येथील ग्रामस्थांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. पंचायत समिती प्रशासनाकडून १ शासकीय आणि ४ खासगी अशा पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
खेड तालुका आणि पाणीटंचाई हे गेल्या अनेक वर्षांचे समीकरण आहे. मार्च महिन्यापासून सुरू होणारी पाणीटंचाई पाऊस पडेपर्यंत टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांच्या नाकीनऊ आणते. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, राजकीय अनास्थेमुळे गेल्या अनेक वर्षांत यावर मार्ग निघालेला नाही.
मार्च महिना उजाडला की, टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची दिनचर्या बदलून जाते. पूर्ण दिवस त्यांचा पाण्याच्या विवंचनेत जातो. काही गावांतील ग्रामस्थ तर रात्रीही सार्वजनिक पाणवठ्यावर बसून हंडाभर पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. यामध्ये खरी ससेहोलपट ही महिलांची होते.
गतवर्षी २२ मार्चला खेड तालुक्यात पाण्याचा पहिला टँकर धावला होता. यावर्षी मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. यावर्षी १ एप्रिलला पाण्याचा पहिला टँकर धावला. गतवर्षी मे महिन्यात २० गावांतील ३८ वाड्या पाण्यासाठी टाहो फोडत होत्या. मात्र, यावर्षी गाव आणि वाड्यांच्या संख्येत घट झाली असून, यावर्षी सद्यस्थितीत १४ गावांतील २५ वाड्या पाणी पाणी करत आहेत.
-----------------------
टंचाईग्रस्त वाड्या
खवटी खालची आणि वरची धनगरवाडी, तुळशी कुबजाई, देवसडे जाधववाडी, मधली वाडी, वैरागवाडी, बौद्धवाडी, सावंतवाडी, कदमवाडी, केळणे मांगणेवाडी, केळणे भोसलेवाडी, तिसंगी धनगरवाडी, चिरणी धनगरवाडी, मुळगाव वरची वाडी, खालची वाडी, खोपी रामजीवाडी, कशेडी बंगला, आंबवली भिंगारा, नांदीवली बौद्धवाडी, कुळवंडी शिंदेवाडी, घेरा रसाळगड निमणी धनगरवाडी, निमणीवाडी, पोयनार मधली वाडी, बौद्धवाडी या गाव आणि वाड्यांना १ शासकीय आणि चार खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
------------------------------------
khed-photo121 खेड तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईमुळे महिला व मुलांच्या डोक्यावर हंडा घेण्याची पाळी आली आहे.