रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे गोविंद बल्लाळ देवल स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार कोकणकन्या शमिका भिडे हिला जाहीर झाला आहे. दि. १४ जून रोजी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा- मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण होणार आहे.मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट गायक-अभिनेत्रींसाठी महाराष्ट्र शासन पुरस्कृत बालगंधर्व पुरस्कार, महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुरस्कृत ज्योत्स्ना भोळे गौरव पुरस्कार, गणरंग पुरस्कृत माणिक वर्मा पुरस्कार आणि सौ. मंगला पाटकर पुरस्कृत कै. वसंत देसाई स्मृती पुरस्कार मिळून दरवर्षी संयुक्त पुरस्कार दिला जातो. यावर्षी या मानाच्या पुरस्कारासाठी रत्नकन्या शमिकाची निवड झाली आहे.इयत्ता चौथीपासून शमिकाने रत्नागिरीत प्रसाद गुळवणी व नंतर मुग्धा सामंत - भट यांच्याकडे गायनाचे धडे गिरविण्यास सुरूवात केली. शिक्षण सुरू असतानाच शमिका एका मराठी वाहिनीवरील सारेगमपमध्ये सहभागी झाली होती. त्याचवेळी गायक अवधूत गुप्ते यांनी शमिकाला कोकणकन्या ही नवीन ओळख करून दिली होती.
गेली आठ वर्षे शमिका जयपूर घराण्याच्या अश्विनी भिडे-देशपांडे यांच्याकडे मुंबईत राहून गायनाचे शिक्षण घेत आहे. कलर्स वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातही ती सहभागी झाली होती.गायनाचे शिक्षण सुरू असतानाच शमिकाने रंगभूमीवर पाऊल ठेवत पहिल्यांदाच संगीत मेघदूत नाटकात अभिनेत्रीची भूमिका साकारली. याशिवाय नाट्यसंपदा व यशवंत देवस्थळी निर्मित चि. सौ. कां. रंगभूमी नाटकात काम करीत आहे. गायिका व अभिनेत्री असा दुहेरी प्रवास सध्या तिने सुरू केला आहे. गौरव कोरगावकर (गोवा) यांच्याशी काही दिवसांपूर्वीच तिचा वाङ्निश्चय झाला असून, डिसेंबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.