लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोना कालावधीत रक्ताचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत विविध सामाजिक संस्था व कार्यकर्ते आपल्या स्तरावर प्रयत्न करीत असतानाच तालुक्यातील रावळगाव येथील शशिकांत मारुती चव्हाण हे रक्तदानाचे अनोखे दायित्व जपत आहेत. या कालावधीत तब्बल १७ रक्तदान शिबिरे व २६ महाआरोग्य शिबिरांसाठी मोलाचा हातभार त्यांनी दिला आहे.
गेली नऊ वर्षे शशिकांत चव्हाण हे वैद्यकीय क्षेत्रात या ना त्या कारणाने कार्यरत आहेत. त्यांची चिपळूण व कोकण विभागातील बहुतांश डॉक्टर व आरोग्य यंत्रणेशी परिचय असल्याने त्याचा अनेक रुग्णांना उपयोग झाला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारांसाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरिता नेहमीच चव्हाण याचा पुढाकार असतो. रात्री-अपरात्री ते रुग्णांच्या मदतीसाठी धावून जातात. एवढेच नव्हे तर वेळ पडल्यास पदरमोड करून नाष्टा, जेवण व औषधोपचारासाठी मदतीचा हात देतात. त्यामुळे त्यांच्या या सामाजिक दायित्वामुळे चव्हाण यांचा आधार अनेकांना मिळतो आहे. सध्या शहरातील पाग येथे राहणारे चव्हाण यांनी विविध राजकीय पक्ष, रुग्णालये व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून १७ रक्तदान शिबिर व २६ महाआरोग्य शिबिरांसाठी योगदान दिले आहे.
डेरवण रक्तपेढी व जिल्हा रुग्णालयासही त्यांची मोठी मदत होत आहे. त्यांच्या या कार्याबद्दल तीन वेळा कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले आहे. याशिवाय खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विद्युत कामगार संघटना कोकण विभाग व क्षेत्रीय मराठा समाजानेही त्यांचा गौरव केला. आमदार भास्कर जाधव व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत यांनी शृंगारतळी येथे घेतलेल्या महाआरोग्य शिबिरात ५७३२ रुग्णांची तपासणी व काहींवर मोफत शस्त्रक्रिया केली होती. यावेळीही चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.
------------------------
चाकरमान्यांसाठी बनले देवदूत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लाॅकडाऊन कालावधीत मुंबई-पुण्यातील अनेक चाकरमानी गावी आले. मात्र, त्यांना तपासणीसह आरोग्य यंत्रणेच्या अन्य नियमांना सामोरे जावे लागत होते. अशा वेळी गोंधळलेल्या चाकरमान्यांनाही चव्हाण यांनी मदतीचा हात दिला. शासकीय कार्यालयांमधील कागदपत्रांची पूर्तता करण्यापासून त्यांच्या आरोग्य तपासणीबाबतही त्यांनी विशेष लक्ष दिले होते.