खेड : लॉकडाऊनमुळे खेडमधील काही मजुरांची व्यवस्था शहरातील ऊर्दू शाळेत करण्यात आली आहे. या कुटुंबातील एका महिलेच्या प्रसुती कळा सुरू झाल्या आणि रात्रीच यंत्रणेची धावपळ सुरू झाली. रात्री १०८ क्रमांक उचलला जात नसल्याने रूग्णवाहिकाही मिळणे मुश्किल झाले होते. नगरपरिषद दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोफिया शेख यांना माहिती देण्यात आली. त्या तातडीने दाखल झाल्या आणि संपूर्ण परिस्थिती पाहता त्या महिलेची शाळेतच प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. सारे काही जुळून आले आणि त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला.लॉकडाऊनमुळे खेड बंदरावर जगबुडी नदीच्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम करणारे सुमारे ४७ मजूर आणि त्यांचे कुटुंबीय शहरातील ऊर्दू शाळेत गेला महिनाभर राहात आहेत. या कुटुंबातील महिलांपैकी दोन महिला गरोदर आहेत. या महिलांवर गेला महिनाभर नगरपरिषदेच्या दवाखान्यामार्फत नियमित तपासणी केली जात आहे. शनिवारी २५ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजता यातील रेणुका राठोड या महिलेला प्रसुतीच्या कळा सुरु झाल्याने मोहल्ल्यातील शिक्षक रिफाई यांनी नगरपरिषद दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोफिया शेख यांना मोबाईलवर फोन करून माहिती दिली. डॉ. सोफिया शेख यांनी दुचाकीवरून ऊर्दू शाळा गाठली. मदतीला आरोग्यसेविका विजया नाईक यांना बोलावले. आरोग्य विभागातील इतर कर्मचारीही फोन केल्यामुळे ऊर्दू शाळेत पोहोचले होते.रात्री साडेबारापासून १०८ नंबरला फोन केला जात होता. पण तो उचलला जात नव्हता. लॉकडाऊनमुळे खासगी वाहने मिळणे अवघड होते. आरोग्य विभागाच्या गाडीने संबंधीत महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा विचार केला, पण ते शक्य झाले नाही. अखेर खूप कमी वेळ असल्याने नगरपरिषदेच्या डॉ. सोफिया शेख यांनी शाळेतच प्रसूती करण्याची तयारी सुरु केली. अखेर त्या महिलेची शाळेतच सुखरूपपणे प्रसुती झाली.
रात्री १ वाजून २ मिनिटांनी रेणुका राठोड या मजूर महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसुती झाल्यानंतर पंधरा मिनिटांनी १०८ रुग्णवाहिका आली. त्यानंतर महिलेला खासगी रूग्णालयात दाखल केले. दवाखान्यातून पुन्हा ऊर्दू शाळेत आणले आहे.