देवरुख : संकटं एकटीदुकटी येत नाहीत... तिचंही तसंच झालं. दोन मुलगे आणि एक मुलगी पदरात टाकून पतीने अचानक कायस्वरूपी निरोप घेतला. पतीच्या जागेवर तुटपुंज्या पगारावर नोकरी मिळाल्याने तिनं थोडीशी उभारी धरली खरी.. पण एका मुलाचे निधन झाले, त्याच्यापाठोपाठ लग्न झालेल्या मुलीचाही मृत्यू झाला. खरं तर कुणीही खचून गेलं असतं. तीही खचून गेली.. पण मुलीच्या चिमुकल्यांकडे बघून तिनं पुन्हा उभारी धरली आणि आईचं छत्र हरवलेल्या नातवंडांचं पालनपोषण तिनं सुरू केलं.... चित्रपटात शोभावी अशी ही कथा आहे संगमेश्वर तालुक्यातील मराठवाडी-हरपुडे येथील सुवर्णा यशवंत सुर्वे यांची. त्यांच्या या कर्तृत्वाचा संगमेश्वर प्रतिष्ठानने सन्मान केला आहे.सुवर्णा सुर्वे यांनी आपले आईचे कर्तव्य तर पार पाडले आहेच, शिवाय आजीचे कर्तव्य पार पाडताना दोन नाती व एका नातवाचे शिक्षण व पालनपोषण करण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे. अशा या कर्तृत्ववान मातेचा व आजीचा संगमेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने मातृदिनी सत्कार करण्यात आला. यावेळी संगमेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, सुरेंद्र माने, सी. एस. जाधव, रंजना कदम उपस्थित होते. त्यांच्या नववीत शिकणाऱ्या नातीला संगमेश्वर प्रतिष्ठानने एका वर्षाच्या शैक्षणिक खर्चासाठी दत्तक घेतले असून, सातवीतील त्यांचा नातू सांदिपनी गुरुकूलमध्ये शिकणार आहे. तर मोठी नात ही दहावी झाल्यानंतर आपल्या दोन्ही आजींना मदत करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.३१ मे रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या आजीला यानंतर हे सर्व अवघड होऊन जाणार आहे. मात्र, अशावेळी संगमेश्वर प्रतिष्ठानने नातीला दत्तक घेतल्यामुळे व नातवाच्या शिक्षणाची सोय केल्यामुळे काहीअंशी तरी सुवर्णा सुर्वे यांना दिलासा मिळाला आहे. प्रतिष्ठानच्या मदतीबद्दल सुवर्णा सुर्वे यांनी आभार मानले आहेत. (प्रतिनिधी)
असंख्य संकटं झेलत ‘ती’नं घडवलं कुटुंब!
By admin | Published: May 14, 2016 12:14 AM