रत्नागिरी : शिक्षणाची आवड असूनही केवळ परिस्थितीमुळे तिला पुढील शिक्षण घेता येत नव्हते. हुशार असूनही घरच्या परिस्थितीमुळे ओढवलेली ही वेळ कुणबी कर्मचारी सेवा संघाच्या नजरेतून सुटली नाही. तनुजा दत्ताराम मौर्ये असे तिचे नाव असून, ती पावस येथे राहते. तिची शिक्षणासाठी असणारी तळमळ पाहून कुणबी कर्मचारी सेवा संघाने तिचा शैक्षणिक भार उचलून तिचे जणू पालकत्वच घेतले आहे.तनुजा हिने सन २०१०-११मध्ये प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २५६ गुण मिळवले. २०१२-१३ गणित स्पर्धा परीक्षेत तिचा राज्यात पहिला क्रमांक आला. २०१३-१४ मध्ये माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २७० गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण यादीत तिचा तिसरा क्रमांक आला. टाटा इन्स्टिट्यूट निबंध स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. तर २०१५-१६ टिळक विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेत २०० पैकी १८२ गुण मिळवून तिने राज्यात पहिला क्रमांक मिळवला. डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेतही तिला रौप्यपदक मिळाले. मात्र, अशा गुणवंत मुलीला पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे शिक्षण सोडावे लागणार होते. मात्र, या अडचणीच्यावेळी कुणबी कर्मचारी सेवा संघ तिच्या मदतीला धावून आला. संघातर्फे वर्षारंभी तिला वह्या, पुस्तके, संदर्भ ग्रंथ, कॅसेट, दप्तर, शाळेचा गणवेश आदी शालोपयोगी वस्तू जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती विजय सालीम यांच्या हस्ते देण्यात आल्या. यावेळी संघाचे उपाध्यक्ष अनंत नैकर, कोषाध्यक्ष मोहन बागवे, तनुजाचे वडील दत्ताराम मौर्ये, दीपक माळी, संदीप फणसे, आबा पालकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
घरच्या परिस्थितीमुळे सोडणार होती ‘ती’ शिक्षण
By admin | Published: June 17, 2016 9:52 PM