लांजा : तालुक्यातील हर्दखळे गावातील स्मशानभूमीचे शेड अद्याप नादुरुस्तच आहे. यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध होण्यासाठी ग्रामस्थांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, तसेच शासकीय यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता; परंतु त्याची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही.
मदतीच्या किटचे वाटप
सावर्डे : चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा बिझनेस फोरमतर्फे सुमारे ५०० किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये झाडू, फिनेल बाॅटल, डस्टपॅन, दोरी, लादी साफ करण्याचे वायफर, डस्टर, किशी, ब्लिचिंग पावडर आदींचा समावेश होता.
जमीन खचली
रत्नागिरी : नजीकच्या मिरजोळे येथील नदीकिनारी असलेली जमीन खचण्याच्या प्रकारात वाढ होऊ लागली आहे. मुसळधार पावसामुळे काही भागांत भेगाही पडल्या असून, तो भाग अधिक खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता येथील ग्रामस्थांच्या मनात मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण झाली आहे.
मुर्शीत भेगा
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी भेंडीचा माळ येथील डोंगर खचला आहे. त्यामुळे जमिनीला भेगा पडल्याने आजूबाजूच्या १६ घरांना धोका निर्माण झाला आहे. तालुक्यात अनेक भागात असे प्रकार घडू लागल्याने ग्रामीण जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
शिक्षक संघाची मदत
दापोली : चिपळूण आणि खेडमध्ये आलेल्या महापुरामुळे संपूर्ण घरे आणि दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत. येथील गरजू आणि बाधित लोकांच्या मदतीसाठी येथील अखिल प्राथमिक शिक्षक संघ पुढे आला आहे. या संघातर्फे दोनशे कुटुंबांना खाद्यपदार्थाबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
व्यापारी संघटनेची मदत
दापोली : दापोली जैन समाज, दापोली शहर व्यापारी संघटना, रामराजे विद्यालय यांच्या माध्यमातून चिपळूण येथील पूरबाधितांसाठी दोन दिवस सेवा करण्यात आली. यात संदीप राजपुरे, चेतन जैन, दिनेश जैन, बाळू कोटिया, माणिक दाभोळे, महेश जैन आदींचा समावेश होता.
बीएसएनएल सेवा ठप्प
राजापूर : तालुक्यातील विल्ये पडवे परिसरामध्ये गेल्या महिनाभर बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे विद्यार्थी ते विविध व्यावसायिक, व्यापारी, बँका यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. इंटरनेट सेवा कोलमडलेली असल्याने कामे ठप्प होत आहेत.
पूरग्रस्तांसाठी मदत
खेड : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खेड तालुक्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला असून, पूरग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी त्यांनी येथील नागरिक आणि व्यापारी यांच्या समस्या जाणून घेतल्या. या पूरग्रस्तांसाठी त्यांच्या माध्यमातून एक ट्रक साहित्यही पोहोच करण्यात आले आहे.
खलाशांसाठी विमा छत्र
मंडणगड : वारंवार येणारी चक्रीवादळे यामुळे नौकामालकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे नौकामालकांनी आपल्या नौकेचा पूर्ण जोखमीचा विमा व त्यावर कार्यरत असलेल्या खलाशांचे किमान पाच लाखांचे विमा कवच घेणे आवश्यक असल्याचे सहायक मत्स्य आयुक्तांनी कळविले आहे.
मोफत जलनेती उपक्रम
खेड : खेड व परिसरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी २२ ते २४ जुलै या कालावधीत जलनेती हा उपक्रम योग विद्याधाम नाशिक शाखा, खेडतर्फे घेण्यात आला. डाॅ. मधुरा बाळ यांनी जलनेती म्हणजे काय आणि तिचे फायदे यावर मार्गदर्शन केले. हा उपक्रम मोफत घेण्यात आला.