रत्नागिरी : जिल्ह्यात आज, ७ मार्चपासून शिमगोत्सवाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील मंदिर प्रमुखांची आणि मंडळ प्रमुखांची बैठक घेऊन उत्सवासंदर्भातील नियमावली सांगितली. यावेळी हा उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.
रत्नागिरीमध्ये आजपासून म्हणजेच फाक पंचमीपासून शिमगाेत्सवाला सुरुवात हाेणार आहे. अनेक ठिकाणी वाजत गाजत हाेळी आणण्यात येणार आहे. तर वेगवेगळ्या मंदिरातील पालख्या गाव भेटीला बाहेर पडणार आहेत. तर होळी पाैर्णिमेला रत्नागिरी शहरातील बारा वाड्याचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी बुवाच्या शिमगोत्सवाला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी माेठ्या संख्येने चाकरमानी दाखल हाेतात. गेले दोन वर्ष काेराेनामुळे शिमगाेत्सवाला हाेणारी गर्दी तुरळक हाेती. मात्र, यावर्षी निर्बंध शिथिल झाल्याने माेठ्या संख्येने चाकरमानी शिमगाेत्सवासाठी दाखल हाेण्याची शक्यता आहे.
हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी रत्नागिरी शहर पोलिसांनी पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर शहर पोलीस स्थानकात रत्नागिरी शहर पोलीस स्थानक हद्दीतील मंदिरे आणि मंडळे यांच्या प्रमुखांची बैठक आयाेजित करण्यात आली हाेती. यावेळी १७ देवस्थानातील ९३ पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांना उत्सव साजरा करताना घ्यावायची खबरदारी, सुरक्षितता याची तसेच नियमावलीची माहिती देण्यात आली. कोरोनाचे अद्यापही समूळ उच्चाटन झालेले नसल्याने मास्क, सॅनिटायझरसह सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे, बाहेरून येणाऱ्या लोकांची नोंद ठेवावी, सीसीटीव्ही कॅमेरा बसावावा, सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करावी, असे चौधरी यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासाेबत वन विभागाचे अधिकारी गौतम कांबळे उपस्थित होते.