रत्नागिरी : चक्रीवादळात मिऱ्या येथे अडकलेल्या जहाजामधील धोकादायक असलेले आॅईल आणि २५ हजार लिटर डिझेल काढण्यात एजन्सीला यश आले आहे. मात्र, किनाऱ्याच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने येत्या चार दिवसामध्ये जहाज काढा, असा अल्टीमेटम प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगल यांनी जहाज एजन्सीला दिला आहे. जहाजाला एक महिना झाला. अडकलेले हे जहाज किनाऱ्यावर रुतल्यामुळे बंधाऱ्यावर आपटण्याचे प्रमाण कमी झाले आहे.जहाज वाचविण्याच्यादृष्टीने जोरदार मोहीम सुरू झाली आहे. भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी (टेक्निशियन) मंचलवार यांनी जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी यांना घेऊन जहाजावरील जळके ऑइल काढण्याची मोहित हाती घेतली. ऑईल गळती होऊन किनाºयाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. ते टाळण्यासाठी प्रादेशिक बंदर विभागाने जहाजाच्या एजन्सीला नोटीस बजावली होती.त्यानुसार पहिल्या टप्प्यात ऑइल काढण्यास सुरुवात झाली. पंप बसवून पाईपद्वारे किनाऱ्यावर मोठे बॅरल ठेवून त्यामध्ये हे ऑईल काढण्यात आले. ३० ते ३५ बॅरल म्हणजे सुमारे साडेसहा ते सात हजार लिटर ऑइल काढण्यात आले.
त्यानंतर लगोलग जहाजामधील सुमारे २५ हजार लिटर डिझेलसाठा सुरक्षित काढण्यात आला आहे. किनारा सुरक्षेच्यादृष्टीने बंदर विभागाने एजन्सीला चार दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.