रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने महिला रुग्णालयात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने महिला रुग्णालयातील स्वॅब तपासणी केंद्र शनिवारपासून शहरातील शिर्के प्रशालेत हलविण्यात आले आहे. त्याठिकाणी स्वॅब तपासणी सुरू केली आहे.
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या संपर्कात येणाऱ्या २० ते ३० जणांची तपासणीही करण्यात येत आहे. तसेच अन्य जिल्ह्यांत, राज्यात जाणाऱ्यांची तसेच येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यांचा स्वॅब घेण्याचे काम महिला रुग्णालयात करण्यात येत होते.
कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने महिला रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रुग्णांसह स्वॅब तपासणीसाठी येणाऱ्या लोकांची गर्दी वाढत आहे. या रुग्णालयातील गर्दी कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने स्वॅब तपासणी केंद्र हलवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शिर्के प्रशालेत स्वॅब तपासणी केंद्र स्थलांतर करण्यात आले असून ते सुरुही करण्यात आले आहे. त्यामुळे शिर्के प्रशालेतील स्वॅब तपासणी केंद्रात पहिल्याची दिवशी लोकांनी गर्दी केली होती.