असगोली : गुहागर तालुक्यातील तवसाळ येथील पुरातन व दुर्लक्षित अशा विजय गडावर पहिल्यांदाच तवसाळ ग्रामस्थांतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी जय भवानी - जय शिवाजी असा जयघोष करण्यात आला.तवसाळ गावामध्ये असणाऱ्या विजयगड किल्ल्याची सध्याची अवस्था फार बिकट आहे. हा किल्ला कोणी व केव्हा उभा केला, याविषयी ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र, उपलब्ध माहितीनुसार १३४७मध्ये अब्दुल मुज्जफर अल्लाउद्दीन बहामनी या मुघल सम्राटाकडे हा किल्ला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या किल्ल्यावर मराठ्यांचे स्वामित्व राहिले. १६९८ पासून सरखोल कान्होजी आंग्रे यांच्याकडे असणारा हा किल्ला कालांतराने पेशव्यांकडे व १८१८ पासून इंग्रजांच्या ताब्यात राहिला. फार पूर्वीचा असणारा हा विजयगड कायम दुर्लक्षित राहिला. तटबंदी नष्ट होत असल्याने किल्ल्याचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. इंग्रजांच्या राजवटीनंतर हा किल्ला व परिसर सुर्वे बंधूंच्या नावे सातबाराला नोंदवला गेला. किल्ला आपल्या नावावर असला तरी जमीनदारांनी त्याचा कोणताही गैरवापर केलेला नाही. त्यांची आजही शासनाला सहकार्य करण्याची भूमिका आहे.अशा प्राचीन विजयगडावर ग्रामस्थांच्यावतीने शिवजयंती साजरी करण्याचा मानस तवसाळ ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी व्यक्त केला. त्याला जमीन मालक व ग्रामस्थांनी भरभरुन दाद दिली. शिवजयंतीच्या पूर्वी ग्रामस्थांच्यावतीने या किल्ल्याची साफसफाई करण्यात आली. किल्ला रस्त्यालगत असल्याने या किल्ल्याची माहिती देणारे बॅनर लावण्यात आले. गडावर शिवप्रतिमेचे पूजन करुन भगवे ध्वज उभारुन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी विजयगडाचा परिसर दणाणून सोडत ग्रामस्थांनी विजयगडावर पहिली वहिली शिवजयंती साजरी केली. (वार्ताहर)गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे दुर्लक्षित विजयगडावर प्रथमच साजरी झाली शिवजयंती, हजारोंची उपस्थिती.किल्ल्याची स्थिती गंभीर, इतिहासप्रेमींना किल्ला वाचवा मोहीम घ्यावी लागणार.
तवसाळ विजयगडावर रंगली शिवजयंती
By admin | Published: February 22, 2015 10:51 PM