रत्नागिरी : कोकण हा सेनेचा बालेकिल्ला ही बिरुदावली निर्माण करण्यात तळागाळातील शिवसैनिकांचे मोठे योगदान आहे. मात्र, महामंडळ अध्यक्षपदांच्या निवडीमध्ये सेनेचे आमदार राजन साळवी, आमदार सदानंद चव्हाण, आमदार वैभव नाईक यांच्यासह अनेक निष्ठावंतांना डावलण्यात आल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे सेनेतील निष्ठावंत सैनिकच आता ‘अजब तुझे सरकार’ म्हणत नाराजी व्यक्त करीत आहेत. निष्ठावंतांनी केवळ पालखीचे भोई म्हणूनच काम करावे का, असा सवाल केला जात असून, सेनेतील असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने महामंडळ पदाधिकाºयांची नियुक्ती केली आहे. ज्यांना मंस्रत्रमंडळात सामावून घेता आले नाही किंवा ज्यांची सेनेप्रती निष्ठा असल्यानेच ‘नंतर पाहुया’ या सेना नेत्यांच्या शब्दामुळे जे शांत राहीले आणि सैनिक म्हणून ज्यांनी हा निर्णय मान्य करीत आज ना उद्या संधी मिळेल, असे आपल्या मनाला समजावले, त्यांची यावेळीही सेनेच्या नेतृत्त्वाकडून घोर निराशा झाल्याची चर्चा शिवसैनिकांमध्येच रंगली आहे.
रत्नागिरीत बराच काळ शिवसेनेचे काम करणारे व सध्या राजापूरचे आमदार असलेले राजन साळवी हे सच्चे व लढवय्ये शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. सध्या ते नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांच्या खांद्याला खांदा लावून लढा देत आहेत. विधिमंडळात सातत्याने विविध प्रश्नांवर आवाज उठवणारे आमदार साळवी यांनी न्यायासाठी राजदंड पळविण्याचाही प्रयत्न केला. आपल्या लढवय्येपणामुळे संपूर्ण राज्यात आपली प्रतिमा निर्माण केलेले राजन साळवी यांनाही कधीतरी सत्तेतील चांगले पद मिळेल, ही त्यांच्या निष्ठावंत सहकारी व चाहत्यांची बºयाच काळापासूनची इच्छा आहे. मात्र, यावेळीही आमदार साळवींना डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे.
चिपळूणमध्ये सदानंद चव्हाण यांनीही पक्षाप्रती निष्ठा जपत राजकीय वादळ वाºयामध्ये सेनेची साथ सोडलेली नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनाही गेल्या काही काळापासून चव्हाण यांना मंत्रिपद मिळावे, असे वाटत आहे. मात्र, मंत्रिपद दूरच साधे महामंडळही चव्हाण यांच्या नशिबी येऊ नये, याचे दु:ख त्यांच्या सहकाºयांना वाटते आहे. महामंडळाच्या झालेल्या नियुक्त्यांमध्ये निष्ठावंतांना वाºयावर सोडल्याची तिखट प्रतिक्रियाही निष्ठावंतांमधून व्यक्त होत आहे.
शिवसेनेच्या कोकण बालेकिल्ल्यातील गडाचे शिलेदार असलेल्या साळवी, चव्हाण यांसारख्या अन्य निष्ठावंतांप्रमाणेच सेनेला रामराम ठोकल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे नेतृत्व करीत मालवण मतदारसंघात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव करून विजयी झालेले व सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेनेची पताका झळकवणारे आमदार वैभव नाईक हेसुध्दा निष्ठावंत शिवसैनिक म्हणूनच ओळखले जातात. मात्र, त्यांनाही सत्तेच्या पदांपासून डावलण्यात आल्याची भावना त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. या निष्ठावंतांना पक्षाने सत्तेची ताकद दिली असती, तर त्यांच्याकडून पक्षसंघटना मजबूत करण्याचे आणखी प्रयत्न झाले असते. परंतु निष्ठावंतांना वाºयावरच सोडले जात असल्याचा अनुभव सातत्याने येत असल्याने सैनिकांनी निष्ठावंत राहावे काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे.नेतृत्त्वाबाबत नाराजी : निष्ठावंतांचा विसर!राज्य विधानसभा व लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील वर्षी होत आहेत. त्याच्या वर्षभर आधी महामंडळ पदाधिकाºयांची घोषणा सरकारने केली आहे. अर्थातच राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या सेनेच्या नेतृत्त्वाकडून पदाधिकाºयांची नावे मुख्यमंत्र्यांकडे पाठवली जातात. परंतु त्यामध्ये सेनानेतृत्त्वाला निष्ठावंतांचा विसर पडल्याची नाराजी सैनिकांमध्ये आहे. त्यामुळे येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत या नाराजीचे वेगळे पडसाद तर उमटणार नाहीत ना, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.अनेक निष्ठावंतांना डावलण्यात आल्याची भावना.निष्ठावंतांनी केवळ पालखीचे भोई म्हणूनच काम करावे का?शिवसेनेतील असंतोष उफाळून येण्याची शक्यता.निष्ठा ठेवली त्याची ही किंमत?