शिवाजी गोरेदापोली : राज्यात महाविकास आघाडी येण्यापूर्वीच दापोली नगरपंचायतीमध्येशिवसेना आणि काँग्रेसने सत्तेसाठी केलेली युती चर्चेचा विषय ठरली होती. पण पाच वर्षे सुखाने संसार केल्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही पक्षात पुढील पाच वर्षांसाठी प्रासंगिक करार होण्याची शक्यता असून, तशी बोलणी या दोन्ही पक्षांमध्ये सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात आहेत. परंतु याला दापोली नगरपंचायत अपवाद असून, येथे या दोन पक्षांची आघाडी गेली पाच वर्षे सत्तेमध्ये राहिली आहे. आता नव्याने निवडणुका होत आहेत. आगामी निवडणुकीतही पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांचा एकत्रित संसार मांडला जाण्यासाठी बोलणी सुरू झाली आहेत. शिवसेनेकडून काँग्रेसला किती व कोणत्या प्रभागातील जागा सोडल्या जाणार, यावर ही आघाडी अवलंबून आहे. या आघाडीला शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी हिरवा कंदील दाखविल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी मात्र ही निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांची आघाडी होणार असल्याचीही चर्चा होत आहे. परंतु भाजपने सध्या तरी एकला चलो रे, अशीच भूमिका घेतली आहे.
दापोली नगरपंचायतीत शिवसेना आणि काँग्रेस यांची आघाडी निवडणुकीनंतर झाली होती. निवडणुकीत शिवसेना व भाजपा युती होती, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. परंतु निवडणूक निकालानंतर काँग्रेसने राष्ट्रवादीची साथ सोडत शिवसेनेशी आघाडी केली. भाजपा व शिवसेना यांच्यातील बोलणी फिसकटल्यामुळे काँग्रेसला सत्तेत जाण्याची संधी मिळाली. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी तत्कालीन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याशी हातमिळवणी करत दापोली नगरपंचायतीमध्ये प्रासंगिक करार केला. हा करार काही काँग्रेसवासीयांना मान्य नव्हता. यावेळेसही काही निष्ठावंत काँग्रेसवासीयांना हा करार मान्य नाही. परंतु राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे काँग्रेस-शिवसेना आघाडी होण्याची शक्यता अधिक आहे.
भाजपसोबत युती करण्याबाबत शिवसेनेत दोन गट आहेत. एका गटाला युती हवी आहे, तर एका गटाला युतीपेक्षा काँग्रेसची सोबत महत्त्वाची वाटत आहे. आमदार योगेश कदम यांनी दापोली नगरपंचायत निवडणुकीची सर्व सूत्रे आपल्याकडे ठेवली आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून माजी आमदार संजय कदम यांच्या जोडीला शिवसेनेतून राष्ट्रवादीत नुकतेच प्रवेश केलेले संदीप राजपुरे यांची साथ मिळाल्याने दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कशी बाजी मारते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या सोबतीने निवडणुकीला सामोरी जाणारी भाजप, शिवसेनेशी फारकत घेऊन कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरी जाते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.