राजापूर : रिफायनरी प्रकल्पासंबंधित जनतेचे हित प्रांजळपणे स्वीकारण्याचे आणि ते जनतेचे मत मांडण्याचे धैर्य शिवसेनेच्या राजापूरमधील दोन्ही नगरसेविकांनी दाखविले. मात्र, तसे धैर्य शिवसेनेचे आमदार राजन साळवी, खासदार विनायक राऊत आणि सेना नेतृत्वाकडे नाही, अशी टीका भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव यांनी केली आहे. प्रकल्प समर्थनाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा खडपे आणि मनिषा मराठे यांचे विशेष कौतुक करताना या रणरागिणींवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाल्यास भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असेही स्पष्ट केले.
रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारा ठराव मंगळवारी झालेल्या नगर पालिकेच्या सभेमध्ये मंजूर झाला. यामध्ये शिवसेनेच्या अन्य नगरसेवकांनी ठरावाच्या विरोधी मतदान केलेले असताना मात्र, प्रतीक्षा खडपे आणि मनिषा मराठे यांनी प्रकल्प समर्थनाच्या ठरावाच्या बाजूने मत मांडले. त्याचे शिवसेनेमध्ये पडसाद उमटताना प्रतीक्षा खडपे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. या साऱ्या घडामोडींवर गुरव यांनी भाष्य केले आहे.
जनतेच्या हिताच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकणाऱ्या व विकासात्मक दृष्टीकोन ठेवणाऱ्या सर्व व्यक्तींचे भाजपामध्ये सदैव स्वागतच असेल, असेही त्यांनी सांगितले. वरकरणी रिफायनरी प्रकल्प विरोध दाखवणाऱ्या विकासशून्य शिवसेना नेत्यांनी आता स्थानिक कार्यकर्ते आणि जनतेला रिफायनरी प्रकल्प हवा की नको हे जाणून घेणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.