विनोद पवारराजापूर : सध्याचा काळ संकटाचा असला तरी उद्धव ठाकरे संघर्ष करीत आहेत. या संघर्षाच्या वाटेत अडचणी आहेत, खाचखळगे आहेत परंतु, शेवटी विजय नक्की आहे. विकास करत असतानाच प्रत्येक हाताला काम देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आम्ही पाऊले टाकत आहोत. मनात राम आणि हाताला काम हेच शिवसेनेचे हिंदुत्व आहे, असे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.राजापूर तालुक्यातील ओणी येथील श्री गजानन मंगल कार्यालय येथे राजापूर - लांजा विधानसभा क्षेत्राचा शिवगर्जना अभियानांतर्गत मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते. या मेळाव्याला पक्षाच्या उपनेत्या मीना कांबळे, महिला आघाडीच्या तृष्णा विश्वासराव, लोकसभा समन्वयक प्रदीप बोरकर, रत्नागिरी संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, महिला लोकसभा संपर्क आघाडीप्रमुख नेहा माने, जिल्हा महिला आघाडीच्या वेदा फडके, युवासेना जिल्हाधिकारी विनय गांगण उपस्थित हाेते.सुभाष देसाई पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील शिवसैनिकांप्रमाणे राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहिले याचा अभिमान आहे. ही शिवसेनेने मिळविलेली संपत्ती आहे. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह चोरले गेले आहे. तरीही येत्या निवडणुकांत १०० टक्के यश मिळाले पाहिजे हा निश्चय करून कामाला लागा. राजापूर विधानसभा मतदारसंघ आपला हक्काचा आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.ते पुढे म्हणाले की, जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने कोणी विकास केला असेल तर ताे उद्धव ठाकरे यांनी. सहा महिन्यापूर्वी शिवसेनेचे ९० टक्के आमदार सोडून गेले. चार दिवसापूर्वी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेले. तरीही शेकडोंच्या संख्येने शिवगर्जना मेळाव्याला लाभलेली उपस्थिती हीच ‘ठाकरे ब्रँड’ची किंमत आहे. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे.शिवसेनेने रत्नागिरी जिल्ह्याला भरभरून दिले आता तुम्ही-आम्ही शिवसैनिकांनी शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना साथ देणे गरजेचे आहे. त्यासाठी किती चौकशा लावल्या, कितीही त्रास दिला तरी मी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणार आहे, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.
मनात राम आणि हाताला काम हेच शिवसेनेचे हिंदुत्व, सुभाष देसाई यांनी स्पष्टचं सांगितलं
By अरुण आडिवरेकर | Published: February 28, 2023 3:35 PM