पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे साधणार संवाद
चिपळूण :शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव हे १२ सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत. शिवसेनेच्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी हिंगोलीमध्ये त्यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. याशिवाय या भागातील पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते स्वतंत्रपणे संवाद साधणार आहेत. औंढा येथे सकाळी १०.३० वाजता नागनाथ महादेव मंदिरामध्ये अभिषेक करून ते या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. त्यानंतर नांदेड नाका, हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. सभेनंतर या भागातील पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशीही ते स्वतंत्रपणे संवाद साधणार आहेत. शिवसेना पक्ष अडचणीत असताना आमदार भास्कर जाधव हे शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने अत्यंत आक्रमकपणे एकाकी लढा देत आहेत. नुकत्याच झालेल्या अधिवेधनादरम्यान एकीकडे विधानसभेत विरोधकांवर तुटून पडताना मुंबईत ठिकठिकाणच्या सभांमध्ये त्यांनी संभ्रमावस्थेत असलेल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी त्यांची शिवसेना नेतेपदी वर्णी लावल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना सभांसाठी आग्रह केला जात आहे. त्यातूनच त्यांचा मराठवाड्याचा दौरा होत आहे.