रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका नेहमीच संदिग्ध राहिली आहे. मोदी सरकार हा प्रकल्प होणार असे ठासून सांगत असताना शिवसेना पक्षप्रमुख मात्र प्रकल्प होणार नाही, असे सांगत आहेत. या सर्व प्रकारात खरे काय ते आमदार राजन साळवी यांना माहिती असल्याने प्रकल्पाबाबतची भूमिका मांडताना त्यांची राजकीय ओढाताण होत आहे. हा प्रकल्प होणार नाही, असे त्यांना वारंवार खोटे बोलावे लागत असल्याचा टोला कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला. शिवसेनेने आजवर जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना विरोध केला. एन्रॉन, जिंदाल आणि आता जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला सेनेचा विरोध आहे. विरोध करून मोठमोठी कंत्राटे मिळवायची, हेच त्यामागचे सूत्र आहे. त्यापेक्षा स्वागत करून स्वत:ची कामे करून घ्या, ढोंगबाजी कशासाठी? वस्तूस्थिती स्वीकारा, असा सल्ला कीर यांनी सेनेला दिला. त्याचबरोबर सेनेची ही दुटप्पी भूमिका लक्षात घेऊन साखरीनाटेतील लोकांनीच काय ते ठरवावे, असे ते म्हणाले. जैतापूर प्रकल्पाबाबत केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना शिवसेनेने केलेला विरोध सर्वांनाच माहित आहे. मग आता तीच शिवसेना मागे का? असा सवाल त्यांनी केला आहे.तिल्लोरी कुणबी समाजाला शेड्युल ट्राइब (एस. टी.) आरक्षण मिळण्याबाबत आघाडी सरकारने शिफारस केली आहे, असे कीर म्हणाले.(प्रतिनिधी)राजापूर १७ वर्षे पिछाडीवर...गेल्या १७ वर्षांच्या काळात राजापूर विधानसभा मतदारसंघ विकास प्रक्रियेपासून खूप दूर राहिला आहे. शैक्षणिक संधीच तेथे नाहीत. राजापूरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी वरिष्ठ महाविद्यालय नाही. असे महाविद्यालय हातिवले गावात आहे. महत्त्वाच्या शैक्षणिक सुविधा आणणे ही तेथील लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. साकव, पाखाड्या म्हणजे विकास नव्हे, असे ते म्हणाले.
‘जैतापूर’बाबत शिवसेना तोंडघशी
By admin | Published: September 11, 2014 9:52 PM