चिपळूण : ‘हॅलो मातोश्रीवरून बोलतोय, सर्व काही ठीक ना, सावध राहा !’ अशा शब्दांत चौकशी करण्यासाठी तालुका व शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांकडे आता मातोश्रीवरुन थेट संपर्क साधला जात असल्याने शिवसेनेतील अनेकजण अवाक् झाले आहेत. शिवसेनेच्या कारकिर्दीत अनेक वर्षांत पहिल्यांदाच हा अनुभव येत असल्याने याबाबत साऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यात सत्तांतर झाले. शिवसैनिक नेहमीच मातोश्रीवर येतात, त्यांना परतायचे आहे, त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी, त्यांना माफ करण्यात येईल, अशा आशयाचे सूचक वक्तव्य खुद्द आदित्य ठाकरे यांनी केले होते. मात्र त्यांच्या या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता बंडखोरीच्या या सत्रानंतर शिवसेनेने पक्ष फुटीच्या पार्श्वभूमीवर अतिशय सावध पवित्रा घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधला जात आहे.शिवसैनिकांमध्ये याविषयी कमालीची चर्चा सुरू आहे. कधी नव्हे ते मातोश्रीवरुन थेट फोन येत असल्याने अनेकजण चकित झाले आहेत. परंतु, त्याचवेळी फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे शिवसेना सतर्क झाली आहे.
‘हॅलो’ मातोश्रीवरून बोलतोय, सावध राहा!, थेट संपर्कामुळे शिवसेनेतील अनेकजण अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 7:07 PM