Kiran Samant News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून महायुतीत सारे काही आलबेल नसल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना इच्छुक होते. मात्र, भाजपाला ही जागा सुटल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यातच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी किरण सामंत अगदी शेवटी रिचेबल झाल्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले. यातच आता ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी केलेल्या टीकेला किरण सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीत नाराजी असल्याने अनेकदा समोर आले आहे. उदय सामंत यांची पोस्टर हटवत किरण सामंत यांनी स्वतःची पोस्टर लावली होती. यावरूनही उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेच्या मतदानादिवशी किरण सामंत जवळपास दिवसभर नॉट रिचेबल होते. ही बाब विशेष चर्चिली गेली. यातच किरण सामंत यांचे कोकणात चांगले काम असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे अशा नेत्याला महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जाण्याची संधी मिळेल, असे विधान ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी केले होते. या विधानाला किरण सामंत यांनी उत्तर दिले.
मला खासदार करण्यास महायुती सक्षम
मला खासदार करायचे की नाही याचा निर्णय महायुती घेईल. मला खासदार बनवायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. राजन साळवींनी माझी काळजी करण्यापेक्षा आपल्या आमदारकीची चिंता करावी. राजन साळवी यांची लांजा-राजापूरची विधानसभेची जागा ही माझ्या अंदाजानुसार महाविकास आघाडीकडून कॉंग्रेस या पक्षाला मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर परवानगी दिली तर मी लांजा-राजापूर विधानसभेसाठी निवडणूक लढण्यास तयार आहे, असे किरण सामंत यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, राजन साळवी हे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, याची मला कल्पना आहे. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शिवसेनेत प्रवेश न केल्यास मी स्वतः लांजा राजापूर मतदारसंघातून धनुष्यबाण या चिन्हाचा उमेदवार असेन, असा इशारा किरण सामंत यांनी राजन साळवी यांना दिला आहे.