कणकवली - सरकारने जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांना शिवसेनेचे मंत्री विरोध करीत असून आमदार व कार्यकर्ते आंदोलनाची भाषा करीत आहेत. मात्र, सरकारमध्ये राहून मंत्रिपदे उपभोगायची आणि सरकारचे लाभार्थी बनून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करायची. त्यापेक्षा सत्तेचा त्याग करून दाखवा, असे खुले आव्हान भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे शिवसेनेला दिले आहे.
शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांसह २५ मे रोजी कणकवलीत इंधन दरवाढीविरोधात रास्तारोको आंदोलन होते. त्यानंतर एका पत्रकार परिषदेतून वैभव नाईक यांनी भाजपावर टीका केली होती. या टीकेला प्रमोद जठार यांनी उत्तर दिले. यावर बोलताना जठार म्हणाले, कणकवली नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग दहामध्ये शिवसेनेने स्वाभिमानला थेट मदत केली. त्याचा वचपा आमच्या लोकांनी कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघात काढला. त्यामुळे नाईक यांनी भाजपाला निष्ठेची भाषा शिकवू नये, असा सल्ला जठार यांनी वैभव नाईक यांना दिला. पालघर ही शिवसेनेच्या पाठीवरची शेवटची काडी आहे. राजकारणात आता काहीही करावे लागते. ते सध्याच्या राजकारणात अपरिहार्य आहे, ते भाजपाने केले असे जठार म्हणाले.
याहीपुढे सगळ्या राजकीय पक्षांना ती भूमिका घ्यावी लागणार असल्याचा टोलाही जठार यांनी शिवसेनेला लगावला आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. राजकारणात सर्वच पक्ष स्वार्थाची भूमिका घेतात. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने स्वाभिमानला का मदत केली, असा सवाल जठार यांनी केला. जर शिवसेना भाजपाबरोबर संधीसाधूपणाची भूमिका घेणार असेल व ऐनवेळी दगा देणार असेल तर भाजपाही ते विसरणार नाही. त्याचा वचपा कुठेतरी काढला जाईल, असे ते म्हणाले. जर शिवसेना भाजपाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असेल तर सत्तेत राहून शिवसेनेचे मंत्री सत्तेची फळे का चाखत आहेत. याचे उत्तर वैभव नाईक यांनी द्यावे. सत्तेत राहून भाजपला त्रास देणे योग्य नसल्याचे जठार यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या नातेवाईकांनी जमिनी खरेदी करून गुंतवणूक केली आहे. त्याचे पुरावे सादर करू शकतो. राज्यात ठाकरेंना राजकारणात कोणीही गृहीत धरत नाहीत, अशी टीकाही जठार यांनी केली.