प्रकाश वराडकर।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी यावेळी पुन्हा एकदा जुन्या पैलवानाबरोबरच राजकीय कुस्तीचा आखाडा रंगणार आहे. रत्नागिरी-सिंधुुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राजकीय खेळाडू जुनेच सामना मात्र नव्याने, अशी राजकीय स्थिती आहे. खासदार विनायक राऊत व माजी खासदार नीलेश राणे हे आमने-सामने उभे ठाकले आहेत. हा गड जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांच्या जोरबैठका सुरू आहेत. या ‘सामन्या’त स्वाभिमानचा ‘प्रहार’ कसा असेल, याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. राऊत व राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात गेल्या वेळी सेना-भाजपची युती असल्याने सेना सचिव विनायक राऊत हे मोदी लाटेमध्ये तब्बल दीड लाख मतांच्या फरकाने विजयी झाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत युती तुटली व या मतदारसंघातील सेनेचे मताधिक्य हे लाखावर आले. गेल्या पाच वर्षात शिवसेना व भाजप हे राज्य व केंद्राच्या सत्तेत एकत्र असले तरी त्यांच्यात कुरघोडीचे राजकारण सातत्याने रंगले. गेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर आधीच्या युतीतील मित्र असलेले सेना व भाजप हे पक्ष, त्यांचे कार्यकर्ते एकमेकावर शत्रूप्रमाणे तुुटून पडले होते. एकमेकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाला. मतदारसंघातील ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी सेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये छत्तीसचा आकडा आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी वरिष्ठ स्तरावर पुन्हा युती झाली असली तरी मतदारसंघात स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना आजही युती मान्य नसल्याचे सांगितले जाते. विनायक राऊतांऐवजी सुरेश प्रभू यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणीही केली जात आहे.भाजपच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षांनीही बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप या निवडणुकीत खरोखरच विनायक राऊत यांना साथ देणार काय, याबाबत सध्यातरी साशंकतेचे वातावरण आहे. असे असले तरी या लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्यावेळी सेनेला लाखाचे मताधिक्य मिळाले होते. हे मताधिक्य फार तुटणार नाही, उलट वाढेल, असे शिवसेनेला वाटते आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या मतदारसंघात येणाऱ्या चिपळूण, रत्नागिरी व लांजा-राजापूर या तीनही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. सेनेने घेतलेल्या पुढाकारानंतर नाणार प्रकल्प रद्द झाला आहे, त्याचा राजकीय फायदा मतांच्या रुपात सेनेला मिळणार की, हा प्रकल्प रद्द झाल्याने प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांकडून रोजगार संधी गेल्याचा प्रचार सेनेला त्रासदायक ठरणार, याबाबत आताच सांगणे धाडसाचे ठरणार आहे.या मतदारसंघातूनच निवडणूक लढविण्याचे आधीपासूनच निश्चित केलेल्या स्वाभिमान पक्षाने गेल्या वर्ष दीड वर्षापासूनच सेनेचा हा गड पोखरण्यास सुरुवात केली. येथे पक्ष संघटना उभी केली. अन्य पक्षांमधील मोहरे पक्षात आणले. आक्रमकतेने विकासाच्या प्रश्नांवर भूमिका मांडली, आंदोलने केली. त्याद्वारे शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे केल्याचे चित्र स्वाभिमान पक्षाने निर्माण केले. नीलेश राणे यांना जिंकता यावे, यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अन्य राजकीय पक्षांमध्ये जोरदार चक्र फिरविण्यास सुरूवात केली आहे. परंतु खासदार म्हणून विनायक राऊत यांनी मतदारसंघाशी सातत्याने संपर्क ठेवल्याने त्याबळावर बाजी मारण्याचा दावा सेनेकडून केला जात आहे. मात्र, विविध मुद्द्यांवरून सेनेची मतदारसंघात कोंडी करण्याचा, सेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न स्वाभिमान पक्षाकडून करण्यात आला आहे व केला जात आहे.भाजपमधील अंतर्गत धुसफूस व सेनेला असलेला विरोध हा स्वाभिमान पक्षाच्या पथ्यावर पडणार काय, याचीही चर्चा मतदारसंघात आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे डावपेच सुरू आहेत. स्थानिक पातळीवर भाजपचे कार्यकर्तेच नव्हे तर भाजपच्या नेत्यांनीही जाहीररित्या विनायक राऊत यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची विधाने केली आहेत. स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवित असला तरी राणे यांनी ‘अबकी बार, मोदी सरकार’ अशी घोषणा आधीच देऊन आपण मोदींबरोबर असल्याचे जाहीर केले आहे, तर शिवसेनाही भाजपबरोबर युतीमध्ये आहे. त्यामुळे राऊत जिंकले काय किंवा नीलेश राणे जिंकले काय, हे मत मोदींनाच मिळणार असल्याचेही स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपने वरवर सेनेला सहकार्य करण्याचा शब्द दिला, तरी स्वाभिमानकडे त्यांची मते झुकणारच नाहीत, असे आज म्हणता येणार नाही. गेल्या दोन दशकांपासून कोकणावर शिवसेनेचे असलेले राजकीय वर्चस्व हे भाजपलाही सलते आहे. त्यामुळे युतीअंतर्गत धोबीपछाड दिला जाणार नाही, हे कोणी सांगावे, अशीही चर्चा रंगली आहे.एकीकडे शिवसेना व स्वाभिमानमध्ये सामना रंगणार असल्याची चर्चा असताना दुसरीकडे कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्यांनी कामाला सुरुवातही केली आहे. दोन्ही जिल्ह्यांचा विचार करता बांदिवडेकर यांची उमेदवारी व त्यांना अपेक्षित असलेली मते सेना-भाजपच्या टकरावात निर्णायक ठरण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. बांदिवडेकर यांचा दोन्ही जिल्ह्यात चांगला संपर्क आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा गेल्या पाच वर्षांमध्ये जाणवण्याइतपत सहभागही होता.रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कॉँग्रेस संघटना म्हणून असलेली मते ही बांदिवडेकर यांना मिळतील, असा दावा पक्षाकडून केला जात आहे. अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनेही येथे उमेदवार उभा करण्याची तयारी केली आहे. रत्नागिरीत या आघाडीचा सत्ता संपादन मेळावाही ८ मार्चला झाला. बसपाही येथे स्वतंत्र उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे. मतांचे विभाजन करण्यासाठी आणखी किती उमेदवार व कोणत्या खेळी खेळल्या जातील, याकडे आता मतदारांचेही लक्ष लागले आहे. एकूणच दोन जुन्या राजकीय खेळाडूंमध्येच ही राजकीय कुस्ती नव्याने होणार हे स्पष्ट झाले आहे.रत्नागिरी मतदार संघाचे तुकडेजेव्हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा एकच रत्नागिरी होता. तेव्हा या मतदार संघाचे दोन भाग होते. उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी. नंतर राजापूर, लांजा तालुक्यांसह राजापूर मतदार संघ झाला आणि अन्य तालुक्यांचा रत्नागिरी मतदार संघ. २00९ साली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा एकच मतदार संघ झाला आणि रत्नागिरीतील दापोली, मंडणगड आणि गुहागर हे तालुके रायगड मतदार संघात गेले.गेल्या निवडणुकीत विनायक राऊत व नीलेश राणे यांना विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मतेमतदारसंघ विनायक राऊत नीलेश राणेचिपळूण ८५,१३२ ५३,९९२रत्नागिरी ९४,१३४ ६२,५६९राजापूर ७७,८८४ ५५,५६९कणकवली ७२,६४१ ७१,२६४कुडाळ ७४,१२३ ५२,२४०सावंतवाडी ८८,९८६ ४७,३६५पोस्टल मते १८८ ३८एकूण मते ४,९३,०८८ ३,४३,०३७
शिवसेना-स्वाभिमान असाच रंगणार सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 10:52 PM