प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीरत्नागिरी जिल्हा परिषद व ९ पंचायत समित्यांसाठी येत्या २१ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे. ही निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप अशी तिरंगी होणार असली तरी शिवसेनेतील ‘महाबंडखोरी’मुळे ‘सेना विरूध्द सेना’ असाच सामना रंगणार असल्याची स्पष्ट चिन्ह आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेला पराभूत करण्याची ताकद सध्या तरी कोणत्याही पक्षात नाही. सेनेला सेनाच पराभूत करू शकते, याचा अनुभव या निवडणुकीत येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून सख्ख्या भावाप्रमाणे राजकीय क्षेत्रात मिरवत होते. काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात भाजपची फारशी ताकद नव्हती. सेनेशी असलेल्या युतीमुळे भाजपलाही जिल्ह्याच्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही हात -पाय पसरता आले. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील सेना-भाजप युती तुटली. त्याचे परिणाम राज्यभरातील युतीवर झाले. तरीही विधानसभा निवडणुकीनंतर सेना राज्याच्या सत्तेत सहभागी झाली. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरातील युतीही सेनेने संपुष्टात आणली. त्याचे परिणाम आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिसून येत आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचा पाया भक्कम आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार शिवेसेनेने केला आहे. सेनेसाठी हा निर्धार प्रत्यक्षात आणणे, त्यांची जिल्ह्यातील ताकद पाहता अशक्य नाही. परंतु जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी सेनेत २००पेक्षा अधिक, तर ९ पंचायत समित्यांमधील ११० जागांसाठी सहाशे ते सातशे इच्छुकांची संख्या पाहता उमेदवार ठरविणे हे सेनेच्या वरिष्ठांसाठी जणू आव्हानच ठरले आहे.आधीच उत्तर रत्नागिरीतील दापोली, खेड, मंडणगडमध्ये सेनेत अनेक नेत्यांची संस्थाने व त्यांच्यातील मतभेद यामुळे संघटनेचे मोठे नुकसान झाले आहे. तेथील मतभेद मिटविण्यात नेत्यांना अजूनही यश आलेले नाही. दक्षिण रत्नागिरीत फारसे वाद नव्हते. तरीही सेनेतील उमेदवारीसाठी इच्छुकांच्या महापुरामुळे भाजपने ही संधी अचूक हेरली. सेनेने नाकारलेल्या इच्छुकांसाठी भाजपने पायघड्या अंथरल्या. भाजपच्या या जाळ्यात सेनेतील अनेक बंडखोर अलगद अडकले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेश मुकादम, देवरूख पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती प्रमोद अधटराव यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. आपले राजीनामे पक्षाकडे सादर केले आहेत. अजून अनेकजण भाजपच्या वाटेवर आहेत. सेनेतील बंडखोरी पाहता या निवडणुकीत सेना विरुध्द सेना असाच सामना रंगण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
खरा सामना रंगणार शिवसेना विरुद्ध शिवसेना
By admin | Published: February 01, 2017 11:33 PM