चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजविले जात नाहीत. त्यामुळे शिवसेनेने आज, सोमवारी सावर्डे येथे खड्यांमध्ये भात लावणी करत अनोखे आंदोलन केले. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संदिप सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वालोपे ते सावर्डे दरम्यान मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. ते तातडीने बुजविण्याची मागणी संदिप सावंत यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली होती. आठ दिवसात खड्डे न बुजविले गेले तर खड्यांमध्ये भात लावणी करेन असा इसारा सावंत यांनी दिला होता. तरी देखील प्रशासनाने हे खड्डे बुजविले नाहीत.यामुळे संतप्त शिवसैनिकांनी आज, अनोखे आंदोलन करत खड्यातच भात लावणी केली. दरम्यान, आरटीओचे अधिकारी रत्नागिरीतून चिपळूणला येत होते. शिवसेनेनी त्याचे वाहन अडवून खड्यांबाबत जाब विचारला. मात्र, आरटीओच्या अधिकाऱ्यांनी खड्यांबाबत हात वर करून ही राष्ट्रीय महामार्ग विभागाची जबाबदारी असल्याचे सांगितले. मात्र आरटीओ वाहनचालकांकडून कर वसूल करते. त्यामुळे तेही तितकेच जबाबदार असल्याचे सांगत सावंत यांनी आरटीओचा निषेध केला. पंधरा दिवसात खड्डे न बुजविले गेल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सावंत यांनी दिला.दरम्यान, खड्डे भरण्याचे काम सुरू असून आंदोलन करू नये, अशी लेखी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून संदिप सावंत यांना देण्यात आली.
मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्यात शिवसैनिकांनी केली भात लावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 4:47 PM