लांजा,10 : अच्छे दिन येतील येतील असे वाटत होते, पण चार वर्षे होत आली तरी अच्छे दिन काही अजून आलेले नाहीत. जनतेने विश्वासाने भाजपच्या हाती सत्ता दिली तर भाजपने जनतेचा विश्वासघात केला, असा आरोप लांजा-राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी केला. महागाई विरोधात लांजा येथे शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाच्या निमित्ताने छोटेखानी सभा आयोजित केली होती. या सभेत राजन साळवी यांनी भाजपवर जोरदार टिका केली.
महागाई विरोधात लांजा तालुका शिवसेनेच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता कोर्लेफाटा येथून या मोर्चाला सुरूवात करण्यात आली. तत्पूर्वी, कोर्लेफाटा येथे सर्व नागरिक एकत्र आल्यानंतर त्याठिकाणी छोटेखानी सभा घेण्यात आली.
या सभेत आमदार राजन साळवी यांनी भाजपवर टिका करत जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्यात हे सरकार अपयशी ठरल्याचे सांगितले. या मोर्चामध्ये सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
वाढत्या महागाईची झळ तुम्हाला बसत नाहीत का, मग प्रतिकार करूया, वाघ आला वाघ आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणांनी लांजा शहर दणाणून गेले होते. कोर्लेफाटा ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार मारूती कांबळे यांना शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.
या मोर्चामध्ये आमदार राजन साळवी यांच्यासमवेत उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, दत्ताजी कदम, चंद्रकांत मणचेकर, शहरप्रमुख गुरूप्रसाद देसाई, जिल्हा परिषद सदस्य पूजा आंबवकर, स्वरूपा साळवी, जया माने, सभापती दीपाली दळवी, सुभाष पवार यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य , ग्रामस्थ सहभागी झाले होते.