रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प रद्द केल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. या घोषणेनंतर आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील शिवसैनिकांनी पेढे वाटून, फटाके वाजवून या निर्णयाचे जंगी स्वागत केले.राजापूर तालुक्यातील नाणारसह लगतच्या १४ गावांमध्ये शासनाने रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित केला होता. येथील काही ग्रामस्थांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. ग्रामस्थांच्या विरोधाला शिवसेनेने पाठिंबा देत प्रकल्प रद्द करण्याचा रेटा सुरूच ठेवला होता. शिवसेनेच्या विरोधामुळे निवडणुकीतील युतीबाबतही साशंकता निर्माण झाली होती. भाजपबरोबर युती करताना रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची अट शिवसेनेने घातली होती. ही अट मान्य करून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.नाणार येथील प्रकल्प रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. त्याचवेळी अधिग्रहीत जमीन परत करणार असून, जिथे स्वागत होईल तिथे हा प्रकल्प उभारला जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले आहे. नाणार येथील हा प्रकल्प रद्द केल्याची घोषणा करताच रत्नागिरीतील खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयाबाहेर आमदार राजन साळवी यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.
यावेळी त्यांचेसमवेत संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, राजेंद्र महाडिक, राहुल पंडित, प्रदीप साळवी, संजय साळवी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी राजन साळवी यांनी सांगितले की, हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे अशी शिवसेनेची पहिल्यापासूनची भूमिका होती. आज हा प्रकल्प रद्द झाल्याने कोकणी जनता आनंदीत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पाची अधिसूचना रद्द केलेल्या घोषणेचे आम्ही स्वागत करत आहोत. शिवसेना पक्षप्रमुखांनी कोकणी जनतेला वचन दिले होते ते पूर्ण झाले असल्याचेही साळवी यांनी यावेळी सांगितले.