खेड : तालुक्यातील रसाळगड किल्ला शिवभक्तांचे आकर्षण असून गडाच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरच विराजमान होणार आहे. यासाठी शिवभक्त रामचंद्र आखाडे यांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे.
उत्खनन बंद करावे
मंडणगड : तालुक्यातील म्हाप्रळ येथे दिवसरात्र बेकायदेशीर वाळू उत्खनन होत असून ३०० ब्रास वाळू काढली जात आहे. यातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने म्हाप्रळ येथील अवैध वाळू उत्खनन बंद करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे.
मोफत घरपोच डबा
दापोली : कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान, दापोली आणि अभाविप यांच्या सहकार्याने दापोलीतील गृहअलगीकरणात असलेल्या तसेच हॉस्पिटलमधील गरजू रुग्णांसाठी एकवेळचा जेवणाचा डबा मोफत दिला जाणार आहे. हा उपक्रम बुधवारपासून सुरू करण्यात आला आहे.
पाण्याचे वाटप
लांजा : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना लांजा तालुका राष्ट्रवादीतर्फे पाण्याच्या बाटल्या मोफत देण्यात येणार आहेत. या रुग्णालयात लसीकरणासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
ई-लर्निंग मेडिकल प्रशिक्षण
रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी इन्टिट्युट ऑफ पब्लिक हेल्थ एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (आयफर) हा लर्निंग मेडिकल एज्युकेशन प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. आयफरच्या माध्यमातून तालुक्यातील आरोग्य क्षेत्रात २० अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
गाळ उपसा अंतिम टप्प्यात
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील देवडे येथील काजळी नदीतील गाळउपसा नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने सुरू झाला आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. नाम फाऊंडेशनने दिलेल्या पोकलेनद्वारे गाळ उपसा सुरू असून महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे बालविकास मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.
आर्थिक मदतीची मागणी
देवरुख : सध्या संचारबंदी लागू झाल्यावर त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात आहे. पुढील आदेश येईपर्यंत धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवण्यात आले आहेत. याचा फटका लोककलावंतांना बसला आहे. लोककला सादर करणाऱ्यांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
एल. व्ही. पवार यांची निवड
रत्नागिरी : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या रत्नागिरी शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी एल. व्ही. पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. संस्थेचे महासचिव अॅड. सुभाष जौंजाळे यांनी ही निवड जाहीर केली आहे. गेली अनेक वर्षे एल. व्ही. पवार जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.
आरोग्यसेवा विस्कळीत
रत्नागिरी : जिल्ह्यात आरोग्यसेवा विस्कळीत झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच आता जेमतेम दीड लाख लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १७ लाख असताना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात उर्वरित नागरिकांना लस कधी मिळणार, अशी विचारणा या नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पुलाच्या कामाला वेग
पावस : रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे ते नातुंडे यांना जोडणाऱ्या सात पऱ्यावरील पुलाचे काम काही दिवसांपूर्वीच सुरू झाले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणार असल्याने वाहतुकीचा खोळंबा दूर होणार आहे. हा पूल कमी उंचीचा असल्याने ग्रामस्थांमधून नव्या पुलाची मागणी होत होती.