देवरुख : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संगमेश्वर तालुक्यातील शिवने आणि करंबेळे या दोन गावांच्या ग्रामदेवतांच्या पालखी भेटीचा सोहळा यावर्षी केवळ निवडक मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती शिवने गावातील मानकरी राजीव डिंगणकर यांनी दिली आहे. दिनांक ३० मार्च रोजी पालखी भेटीच्या कार्यक्रमाला भाविकांनी आणि बाहेरील व्यापाऱ्यांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन दोन्ही गावातील मानकरी मंडळींतर्फे करण्यात आले आहे.
प्रतीवर्षी धूलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी या दोन गावातील ग्रामदेवतांच्या पालख्यांची भेट होते. संगमेश्वर-देवरुख या मुख्य मार्गावर दोन्ही गावांच्या सीमेवर होणाऱ्या या पालखी भेट सोहळ्यानिमित्त मोठी यात्रा भरते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध वस्तूंच्या विक्रीसाठी बाहेर गावाचे बहुसंख्य व्यापारी दुकाने थाटतात. यंदा कोरोनामुळे दिनांक ३० मार्च रोजी होणारा हा यात्रोत्सव होणार नाही. दोन्ही गावातील प्रमुख मानकरी मंडळींच्या उपस्थितीमध्ये केवळ परंपरेनुसार भेटीची औपचारिकता पार पडणार आहे. यामुळे ग्रामस्थ, भाविक आणि व्यापारी मंडळींनी हजेरी लावू नये आवाहन राजीव डिंगणकर यांनी केले आहे.