आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी, दि. १७ : राज्य परिवहन महामंडळाने अद्ययावत वातानुकूलीत ‘शिवशाही’ बस रत्नागिरी - मुंबई मार्गावर सुरू केली. दि. १० रोजी मुंबईहून सुटलेली ही गाडी रत्नागिरीत दि. ११ रोजी पोहोचली. रत्नागिरी आगारातून उद्घाटन झालेली बसही मुंबईकडे रवाना झाली. मात्र, दि. ११ रोजी रात्री ९.४५ वाजता मुंबईहून सुटलेली बस पनवेलमध्येच थांबविण्यात आली. बसमधील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना तिकिटातील फरकाची रक्कम देऊन एस्. टी.च्या निमआराम गाडीतून रत्नागिरीकडे पाठविण्यात आले.
संपूर्ण वातानुकूलीत असलेल्या ४५ आसनी या गाडीमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रत्नागिरी आगारातूनही पहिल्या दोन दिवसांचे या गाडीचे आरक्षण फुल्ल झाले होते. मुंबई मध्यवर्ती बसस्थानकातून सुटलेल्या गाडीचेही आरक्षण फुल्ल होते. मात्र, रत्नागिरीतील मुहूर्तादिवशीच शिवशाहीला गालबोट लागले.
मुंबईहून ही बस वेळेवर सुटली. मात्र, पनवेल येथे आल्यानंतर गाडीत तांत्रिक बिघाड असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. त्यानंतर तिकीट दरातील फरकाची रक्कम वितरीत करून अन्य गाडीत बसवून रत्नागिरीकडे रवाना करण्यात आले.
तोट्यात असलेल्या महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अद्ययावत वातानुकूलीत शिवशाही बस सुरू केली आहे. दि. १० रोजी मुंबईत उद्घाटन झालेली ही गाडी रत्नागिरीत आली. दि. ११ रोजी रत्नागिरीत उद्घाटन होऊन ती मुंबईकडे रवानाही झाली. या मार्गावर दोन गाड्या चालविण्यात येत आहेत. त्यामुळे ११ रोजी मुंबईतून रात्री ९.४५ वाजता सुटलेली बस नवी कोरी होती. त्यामुळे नव्या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो, याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्य परिवहन महामंडळाने रत्नागिरी - मुंबई मार्गावर चालवण्यासाठी दोन शिवशाही गाड्या घेतल्या आहेत. राज्यात ५०० गाड्या टप्याटप्याने सुरु करण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. यातील पहिली गाडी रत्नागिरी मार्गावर धावली. प्रत्यक्षात या अद्ययावत वातानुकूलीत गाड्या एका खासगी कंपनीकडून महामंडळाने चालवण्यासाठी घेतल्या आहेत. गाडीची देखभाल दुरूस्ती व चालक याची जबाबदारी संबंधित कंपनीकडे देण्यात आली आहे. तर गाडीत वाहक मात्र महामंडळाचा असणार आहे. रत्नागिरीकडे येणारी गाडी वेळेत सुटली. परंतु, पनवेलच्यापुढे गाडी येऊ शकली नाही, त्यामुळे नव्या उमेदीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला.