रत्नागिरी - कोंडगाव बाजारपेठेतील सुरेश मुरलीधर खेडेकर (कोंडगाव) यांचे किराणा मालाचे दुकान आगीत भस्मसात झाले. आग पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास लागली.
पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास दुकानातून धूर येत असल्याचे काही ग्रामस्थांच्या लक्षात आले. दुकानाला आग लागल्याची शक्यता लक्षात घेऊन खेडेकर यांना याची कल्पना देण्यात आली.
दुकानाला आग लागल्याचे समजताच कोंडगावमधील ग्रामस्थ, महिला यांनी घटनास्थळी धाव घेतली व आग विझवण्यास सुरुवात केली. दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत दुकानातील संपूर्ण माल व फर्निचरसह इतर सामान जळून खाक झाले. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.
काहींच्या मते आग शॉर्टसर्कीटने लागली असावी. आगीचे वृत्त समजताच कोंडगावचे पोलीसपाटील मारुती शिंदे, पंचायत समिती सदस्य जया माने, संजय गांधी, माजी उपसरपंच अजय सावंत, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर कबनुरकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य करण्यास मदत केली. कोंडगावचे सरपंच बापू शेट्ये यांच्याशी संपर्क साधला असता ते मुुंबई येथे असल्याने त्यांनी दूरध्वनीद्वारे घटनेची माहिती घेतली असून ते मुंबईहून कोंंडगावकडे येण्यास निघाले आहेत. कोंडगावचे तलाठी मुरकुडे, पोलीसपाटील मारुती शिंदे यांनी पंचनामा केला आहे.
पुर्ये येथील ग्रामस्थ सुभाष लोटणकर यांनी आपले वाहन डंपर उपलब्ध करून देऊन मदत केली. अनेकांनी खेडेकर कुटुंबाला धीर दिला.