रत्नागिरी : तालुक्यातील कारवांचीवाडी येथे दुकान मालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या तीन संशयितांनी दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
किशोर कांतीलाल परमार (३०, सध्या रा. सिंधुदुर्ग, मूळ रा. राजस्थान), अणदाराम भुराराम चौधरी (२९, सध्या रा. बेळगाव, मूळ रा. राजस्थान) आणि ईश्वरलाल तलसाजी माझीराणा (२१, रा. राजस्थान) या संशयितांविरोधात भेराराम ओखाजी सुन्देशा (३८, रा. खेडशी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार ६ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास भेराराम यांच्या मालकीच्या महालक्ष्मी ट्रेडर्स या दुकानात या तिघांनी येऊन त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत रोख रक्कम १५ हजार रुपये, सोन्याची अंगठी, मोबाइल, सीसीटीव्ही डिव्हीआर असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन गाडीतून पळ काढला होता. ग्रामीण पोलिसांनी तिघांना गुजरातमधून अटक केली होती. तिघेही पोलीस कोठडीत असून, त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.