रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी येथील कासव संवर्धन केंद्रातून ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या कासवाची ४९ पिल्ले समुद्राकडे झेपावली.
दुर्मीळ होत चाललेल्या या प्रजातीच्या संवर्धानासाठी वन खात्याकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील अनेक किनाऱ्यांवर कासवांच्या अंड्यांचे संवर्धन केले जाते. दापाेली तालुक्यात हे प्रमाण अधिक आहे. गेली काही वर्षे गावखडी येथेही कासवांच्या अंड्यांचे संवर्धन केले जात आहे. मंगळवारी गावखडी येथील केंद्रातून ४९ पिल्ले समुद्राकडे झेपावली.
पूर्णगड सागरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरेश गावीत यांचे हस्ते ही पिल्ले सोडण्यात आली. त्यावेळी पूर्णगड सागरी पोलीस स्थानकातील कर्मचारी भाताडे, सावंत, संवर्धन केंद्राचे निसर्ग मित्र प्रदीप डिंगणकर, राकेश पाटील, पोलीस मित्र जयदीप परांजपे, बंड्याशेठ तोडणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.